सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) क्षेत्राने १५ कोटींहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करून महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. या उल्लेखनीय कामगिरीची घोषणा केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) मंत्री नारायण राणे यांनी नुकतीच X (पूर्वी ट्विटर म्हणून ओळखले जाणारे) समाजमाध्यम पोस्टच्या माध्यमातून केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या कामगिरीमध्ये उद्यम पोर्टलचे महत्त्वाचे योगदान राणे यांनी अधोरेखित केले. उद्यम पोर्टलवर ३ कोटी एमएसएमई कंपन्यांच्या नोंदणीसह उद्यम सहाय्यक पोर्टलवर नोंदणीकृत ९९ लाख अनौपचारिक एमएसएमई कंपन्यांचा समावेश आहे. या ३ कोटी नोंदणीकृत एमएसएमईपैकी ४१ लाखांहून अधिक एमएसएमई कंपन्या महिलांच्या मालकीच्या आहेत.

हेही वाचाः आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ०९ नोव्हेंबरपर्यंत १२.३७ लाख कोटी रुपये एकूण प्रत्यक्ष कर संकलन

एमएसएमई क्षेत्रातील महिला कामगारांच्या महत्त्वपूर्ण योगदानावरही नारायण राणे यांनी भर दिला. या क्षेत्रातून १५ कोटी रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या असून, त्यापैकी ३.४ कोटी पेक्षा जास्त नोकरदार महिला आहेत. हे महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि एमएसएमई क्षेत्राद्वारे महिलांचे सक्षमीकरण करण्याची सरकारची वचनबद्धता प्रतिबिंबित करते, असे त्यांनी नमूद केले.

हेही वाचाः दिवाळीपूर्वी सोने-चांदीच्या दरात घसरण, दुकानदारांना मोठ्या विक्रीची अपेक्षा

पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाला राणे यांनी या यशाचे श्रेय दिले. एमएसएमई क्षेत्रासाठी त्यांनी दिलेले अतुलनीय पाठबळ त्याच्या वाढीसाठी आणि विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे . पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली एमएसएमई मंत्रालय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांना सक्रियपणे प्रोत्साहन देत आहे. उपजीविकेची नवी साधने निर्माण करत आहे आणि देशभरातील व्यक्तींना सक्षम बनवत आहे, असे राणे यांनी सांगितले. हा महत्त्वाचा टप्पा एमएसएमईच्या लवचिकता आणि समर्पित वृत्तीची साक्ष आहे. सरकारचे निरंतर पाठबळ आणि उपक्रम एमएसएमई क्षेत्राला अधिक बळकट करतील, यामुळे भारताच्या आर्थिक विकासाला आणि समृद्धीला हातभार लागेल, असे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Creation of more than 15 crore employment opportunities with registration of over 3 crore msme companies on udhyam portal says narayan rane vrd