वृत्तसंस्था, नवी दिल्ली

भारतीय नवउद्यमी परिसंस्था (स्टार्टअप इकोसिस्टम) आणि या क्षेत्रातील नवोन्मेषाचा उपहास करणाऱ्या केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्या टिप्पणीवर उद्योग जगतातून शुक्रवारी तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. इन्फोसिसचे माजी मुख्याधिकारी मोहनदास पै, झेप्टोचे मुख्याधिकारी आदित पालिचा यांसह अनेकांनी या त्यावर तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

गोयल यांनी भारतातील नवउद्यमी उपक्रमशीलतेवर, विशेषतः द्रुत व्यापार (क्विक कॉमर्स) क्षेत्राला उद्देशून, ‘दुकानदारी का ही काम करना है या विश्वव्यापी और आंतरराष्ट्रीय स्तर पर भारत की पहचान बनानी है?’ असा प्रश्न केला. अर्थात फक्त दुकानदारीचे काम करत राहणार, की जागतिक स्तरावर भारताची ओळख निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवणार आहात? यासह त्यांनी भारतीय स्टार्टअप्सची तुलना चीनमधील स्टार्टअप्सशी केली आणि डीप टेक आणि नवोपक्रमावर लक्ष केंद्रित करण्याचा अभाव दिसून येतो, असा दावा केला.

याचा समाचार घेताना, मोहनदास पै यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) समाजमाध्यमावर वाणिज्यमंत्री गोयल यांना उद्देशून शुक्रवारी टिप्पणी केली. ते म्हणाले, ‘भारतात चिप डिझाइन, आयओटी, रोबोटिक्स, ईव्ही चार्जिंग, बीएमएस यासारख्या क्षेत्रात अनेक लहान डीप टेक स्टार्टअप्सची वेगाने वाटचाल सुरू आहे, पण सरकारचे पाठबळ, भांडवल कुठे आहे?’

जगातील तिसरी मोठी स्टार्टअप्स परिसंस्था म्हणून मिरवणाऱ्या भारतीय नवउद्यमींनी २०१४ ते २०२४ दरम्यान गुंतवणूकदारांकडून १६० अब्ज डॉलरचा निधी मिळविला, त्या उलट चीनच्या स्टार्टअप्सनी ८४५ अब्ज डॉलर, तर अमेरिकेतील उपक्रमांनी २.३ लाख कोटी (ट्रिलियन) डॉलरचे साहाय्य मिळविले. तुमच्या प्रयत्नांनंतरही दीर्घकालीन गुंतवणूकदार जसे की एंडोमेंट्स, विमा क्षेत्र अजूनही गुंतवणुकीसाठी भारतीय स्टार्टअप्सकडे पाठ करून आहेत, असे नमूद करून पै यांनी ही परिस्थिती सुधारणा करण्याची गोयल यांना विनंती केली.

झेप्टोचे पालिचा यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत, सरकारला दरवर्षी १,००० कोटी रुपयांचे कर महसुलाचे योगदान, देशात एक अब्ज डॉलरपेक्षा जास्त थेट परकीय गुंतवणूक आणि भारताच्या विशेषतः ताजी फळे आणि भाज्यांच्या पुरवठा साखळ्यांसाठी शेकडो कोटींची गुंतवणूक. जर याला भारतीय नवोपक्रमातील चमत्कार म्हणायचे नाही, तर काय म्हणायचे हे मलाही प्रामाणिकपणे माहित नाही, असे उपरोधाने नमूद केले.