दुबई: एप्रिलमधील पाच दिवसांच्या व्यापारात आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाच्या किमतीत जवळपास १५ टक्के घट झाली असून, सोमवारी ब्रेंट क्रूडचे व्यवहार पिंपामागे ६३ डॉलरपेक्षा थोडे जास्त पातळीवर सुरू होते. गेल्या वर्षी याच काळात पिंपामागे ९० डॉलरवर गेलेल्या किमतीच्या तुलनेत सध्याची घसरण जवळजवळ ३० टक्क्यांच्या घरात जाणारी आहे.
अमेरिकेने ट्रम्पनीतितून आयात करात केेलेल्या वाढीने जगभरात उडवून दिलेल्या अनिश्चिततेच्या धुरळ्यातून तेलाच्या किमती तीव्रपणे घसरल्या आहेत. ट्रम्प प्रशासनाने जाहीर केलेल्या करवाढीचा जागतिक व्यापारावर नकारात्मक परिणामांतून खनिज तेलाच्या बाजारपेठेला अतिरिक्त अस्थिरतेचा सामना करावा लागेल, अशी चिन्हे आहेत.
सौदी अरेबिया आणि आखातातील तेल उत्पादकांसह, इतर देशांसाठी उत्पादन खर्चाच्या तुलनेत सध्याच्या किमती ६० डॉलरच्या जवळ जाणे हे त्यांच्यासाठी तोट्याच्या ठरतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यापासून बचावासाठी बहारीन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांच्या ‘गल्फ को-ऑपरेशन कौन्सिल’ने संयुक्तपणे तेल आयातीवर १० टक्के शुल्क लादले आहे.
आखाती देशांच्या उपाययोजना आणि इतर देशांकडून अमेरिकेला प्रत्युत्तरादाखल स्वीकारल्या जाणाऱ्या अपेक्षित योजनांमुळे, आंतरराष्ट्रीय व्यापाराची स्थिरतेला बाधा येण्यासह आणि तेलाची मागणीही कमी होऊ शकते, असे पीडब्ल्यूसीने म्हटले आहे. गेल्या आठवड्यात, तेल निर्यातदारांच्या ‘ओपेक प्लस’ गटाचे सदस्य असलेल्या अल्जेरिया, इराक, कझाकस्तान, कुवेत, ओमान, रशिया, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातींनी तेल उत्पादनास गती देण्यास सहमती दर्शविली. २०२२ नंतर या गटाने प्रथमच तेल उत्पादन वाढविण्याचे ठरविले, ज्याचा परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारात किमतीत लक्षणीय घसरताना दिसून आल्या.