ढासळत्या रुपयासह आयात खर्चात वाढीचे संकट 

मुंबईः आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या भावातील वाढ सोमवारी सलग तिसऱ्या सत्रात कायम राहिली. खनिज तेलाचा भाव प्रति पिंप ८० डॉलरवर पोहोचला असून, ही चार महिन्यांतील उच्चांकी पातळी आहे. अमेरिकेने रशियाच्या खनिज तेलावर नवीन निर्बंध लादल्याने भारत आणि चीन यांसारख्या मोठ्या आयातदार देशांना याचा फटका बसणार असून, या निर्बंधांतूनच तेलाच्या किमतीही तापत चालल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताकडून तेल आयातीच्या किमतीसाठी मानदंड असलेल्या ब्रेंट क्रूडचा भाव प्रति पिंप १.५ टक्क्याने वाढून ८०.९६ डॉलरवर पोहोचला आहे. ही पाच महिन्यांतील उच्चांकी पातळी असून, याआधी २७ ऑगस्टला या भावाने ८१.४९ डॉलरची पातळी गाठली होती. नवीन २०२५ वर्षात म्हणजेच ८ जानेवारीपासून खनिज तेलाच्या किमतीत तब्बल ६ टक्के वाढ झालेली आहे.

हेही वाचा >>> Union Budget 2025 : १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प, टॅक्स रिजीममध्ये बदल होणार? निवृत्ती वेतन वाढणार? काय आहेत अपेक्षा?

अमेरिकेने रशियाच्या खनिज तेलावरील निर्बंध वाढविले आहेत. त्यात गझप्रॉम नेफ्टसह बड्या तेल उत्पादकांसह रशियाच्या खनिज तेलाची वाहतूक करणाऱ्या १८३ जहाजांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. युक्रेनविरोधातील युद्धात खनिज तेलातून मिळालेल्या पैशाचाच वापर रशियाकडून सुरू असल्याने अमेरिकेने रसदबंदी या नात्याने ही कारवाई केली.

भारत, चीनला फटका बसण्याची चिन्हे

नवीन निर्बंधांचा फटका रशियातील तेल निर्यातीला बसणार आहे. बरोबरीने रशियन तेलाचे चीन आणि भारतासारख्या मोठ्या आयातदार देशांनी आता तेलासाठी आखाती देशांसह, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील देशांकडे मोर्चा वळविणे क्रमप्राप्त ठरणार आहे. यामुळे खनिज तेलाच्या भावात वाढ होण्यासह, आयातीवरील वाहतुकीच्या खर्चाचा भारही वाढणार आहे, असे विश्लेषकांचे मत आहे.

ट्रम्प राजवटीचे धक्के अद्याप बाकी…

रशियन तेलाच्या निर्यातीवरील निर्बंध वाढल्याने, खनिज तेलाचा पुरवठा विस्कळीत होईल, अशी बाजारपेठेत स्वाभाविक भीती आहे. तरी डोनाल्ड ट्रम्प हे पुढील सोमवारी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेत आहेत. त्यानंतर काय होईल, हे अद्याप स्पष्ट नाही. वस्तुतः त्यानंतरच तेलाच्या बाजारपेठेत फार मोठी उलथापालथ आणि त्याच्या झळा अनुभवास येतील, असे विश्लेषकांचे कयास आहेत. 

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crude oil prices at 80 dollar per barrel on global supply concerns print eco news zws