नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर सहा महिन्यांच्या नीचांकी पातळीवर ओसरल्या असून, त्या परिणामी गुरुवारी सलग चौथ्या सत्रात तेल विपणन कंपन्यांच्या समभागांमध्ये वाढ झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवीन आर्थिक वर्षात एप्रिलपासून उत्पादन वाढवण्याच्या ‘ओपेक प्लस’ या तेल उत्पादक आणि निर्यातदार देशांच्या संघटनेने निर्णय घेतला आहे. त्याचा परिणाम म्हणून खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती पिंपामागे ७० डॉलरखाली उतरल्या आहेत. या घडामोडीच्या लाभार्थी ठरणाऱ्या सरकारी तेल कंपन्यांच्या समभागांचे भाव वाढले आहेत. यातून भारतीय तेल विपणन कंपन्यांच्या किरकोळ इंधन विक्रीवर मिळणारे नफ्याचे प्रमाण वाढण्याची अपेक्षा आहे.

गुरुवारच्या सत्रात हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनचा समभाग ३.९९ टक्क्यांनी वधारून ३३९.१५ रुपयांवर बंद झाला, इंडियन ऑइलचा समभाग २.४९ टक्क्यांनी वधारून १२५.६४ रुपये आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन ३.६० टक्क्यांनी वधारून २६५.०४ रुपये रुपयांवर बंद झाला. याबरोबरच, विमान कंपन्यांचे समभाग देखील वधारले, स्पाइसजेट २.२९ टक्क्यांनी वाढून ४९.५७ रुपयांवर स्थिरावला आणि इंटरग्लोब एव्हिएशन (इंडिगो) १.३७ टक्क्यांनी वाढून ४,७६२.४० रुपायंवर बंद झाला.

कच्च्या माल खनिज तेलाचा मोठा भाग वापरणाऱ्या टायर उत्पादकांच्या समभागांमध्ये देखील जोरदार वाढ दिसून आली. अपोलो टायर्स, सीएट, बालकृष्ण इंडस्ट्रीज, एमआरएफ आणि जेके टायर इंडस्ट्रीजचे समभाग प्रत्येकी १.६० टक्क्यांहून अधिक वधारले. चीन आणि कॅनडा या दोन्ही देशांनी अमेरिकी वस्तूंवर जशास तसे कर लादून प्रत्युत्तर दिल्याने, व्यापार युद्ध तीव्र झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमती सहा महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेल्या आहेत. व्यापार युद्धामुळे खनिज तेलाच्या किमतींवर दबाव वाढला आहे. ओपेक प्लस देश एप्रिलपासून उत्पादन वाढवणार असल्याने तेलाच्या किमती घसरल्या आहेत, असे मेहता इक्विटीज लिमिटेडचे कमॉडिटीजचे उपाध्यक्ष राहुल कलंत्री म्हणाले.