मुंबई : देशाची चालू खात्यावरील तूट डिसेंबर २०२२ अखेर संपलेल्या तिमाहीत कमी होऊन १८.२ अब्ज डॉलरवर आली आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) तुलनेत तिचे प्रमाण २.२ टक्क्यांचे आहे.
रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, चालू खात्यावरील तूट ही आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत ३०.९ अब्ज डॉलर होती. सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या तुलनेत ती ३.७ टक्के होती. मागील आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीत चालू खात्यावरील तूट २२.२ अब्ज डॉलर अथवा सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या तुलनेत २.७ टक्के होती. यावेळी तिसऱ्या तिमाहीत वस्तू व्यापार तूट कमी झाल्याने चालू खात्यावरील तूट सावरण्यास मदत झाली आहे.
चालू आर्थिक वर्षात दुसऱ्या तिमाहीत ७८.३ अब्ज डॉलर असलेली वस्तू व्यापार तूट तिसऱ्या तिमाहीत ७२.७ अब्ज डॉलरवर आली आहे. सेवांच्या निर्यातीत मागील वर्षाच्या तुलनेत २४.५ टक्के वाढ झाली आहे. सॉफ्टवेअर, व्यवसाय आणि वाहतूक सेवांची वाढलेली निर्यात यासाठी कारणीभूत ठरली आहे. ठरावीक कालावधीत देशाने केलेली वस्तू व सेवांची आयात आणि निर्यात यातील तफावत म्हणजे चालू खात्यावरील तूट असते. भारताच्या बाबतीत वस्तूंची आयात ही निर्यातीपेक्षा बहुतांश वेळा अधिक असल्याने हे प्रमाण कायम तुटीचे असते.
थेट परकीय गुंतवणुकीत घट
डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत निव्वळ थेट परकीय गुंतवणुकीत घट होऊन ती २.१ अब्ज डॉलरवर आली आहे. मागील वर्षात तिसऱ्या तिमाहीत ती ४.६ अब्ज डॉलर होती. याच वेळी तिसऱ्या तिमाहीत निव्वळ परकीय संस्थात्मक गुंतवणूक ४.६ अब्ज डॉलर झाली आहे. मागील आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीत ५.८ अब्ज डॉलरची निव्वळ परकीय संस्थात्मक गुंतवणूक बाहेर गेली होती.
चालू खात्यावरील तूट
एप्रिल ते डिसेंबर २०२१ : १.१ टक्के
एप्रिल ते डिसेंबर २०२२ : २.७ टक्के
.