महादेव बेटिंग अ‍ॅपच्या जाळ्यात आधी बॉलिवूड सेलिब्रिटी अडकले आणि नंतर त्यात आता राजकारण्यांची नावे समोर आली आहेत. विशेष म्हणजे हा सापळा आणखी खोलवर गेल्याचं समोर आलं असून, क्रिकेट मॅच फिक्सिंगचे नावही त्यात आले आहे. आता त्याचे धागेदोरे थेट व्यावसायिक जगापर्यंत जाऊन पोहोचले आहेत. आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करणाऱ्या FMCG क्षेत्रातील बड्या कंपन्यांपैकी एक असलेल्या डाबर समूहातील उच्च अधिकाऱ्यांचंही महादेव बेटिंग अ‍ॅपमध्ये नाव आलं आहे. एवढेच नाही तर याप्रकरणी मुंबई पोलिसांनी त्याच्यावर गुन्हाही दाखल केला आहे. महादेव बेटिंग अॅपप्रकरणी मुंबई पोलिसांनी ३२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये डाबर ग्रुपचे संचालक गौरव बर्मन आणि चेअरमन मोहित बर्मन यांच्या नावाचाही समावेश आहे. या लोकांविरुद्ध फसवणूक, जुगार अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचाः Tata Technologies IPO : अखेर मुहूर्त सापडला! टाटांचा ‘हा’ IPO पुढील आठवड्यात उघडणार

एफआयआरमध्ये नावे नमूद

या प्रकरणी मुंबई पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरमध्ये मोहित बर्मन हा १६ वा आणि गौरव बर्मन हा १८ वा आरोपी आहे. या एफआयआरमध्ये एकूण ३१ जणांची नावे आहेत, तर एका अज्ञात व्यक्तीलाही आरोपी करण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनकर यांच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी ७ नोव्हेंबरला हा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचाः ‘ही’ महिला चालवते ४१ हजार कोटींची मद्याची कंपनी, पगाराचा आकडा पाहून थक्क व्हाल!

अभिनेता साहिल खानवर मोठे आरोप

‘स्टाईल’ चित्रपटाने प्रसिद्ध झालेला साहिल खान या एफआयआरमध्ये २६ व्या क्रमांकावर आहे. साहिल खान महादेवच्या ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपशी संबंधित दुसरे अ‍ॅप चालवत होता. एफआयआरमध्ये साहिल खानवर केवळ या अॅपची जाहिरात केल्याचा आरोप नाही, तर त्याच्यावर अ‍ॅपच्या ऑपरेशनमध्ये सहभागी असल्याचा आणि त्यातून नफा कमावल्याचा आरोप करण्यात आला आहे. साहिल खानचा एक व्हिडीओही व्हायरल होत आहे. यामध्ये तो दुबईत महादेव बेटिंग अ‍ॅपच्या पार्टीत सहभागी झालेला पाहायला मिळतंय. साहिल खानवर महादेव बेटिंग अ‍ॅपशी संबंधित ‘खिलाडी’ अ‍ॅप चालवल्याचा आरोप आहे.

या कलमान्वये गुन्हा दाखल

आपल्या तक्रारीत सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनकर यांनी अ‍ॅपच्या माध्यमातून लोकांची १५ हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ आणि १२० (बी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dabur group also got caught in the web of mahadev app case filed against 32 people vrd