मुंबईः विविध प्रकारच्या ट्रान्सफॉर्मर्सची उत्पादक कंपनी डॅनिश पॉवर लिमिटेडचा (एसएमई) श्रेणीतील आजवरचा सर्वात मोठा ‘आयपीओ’ येत्या २२ ऑक्टोबरला खुला होईल. १९८ कोटी रुपयांचा निधी उभारण्याचे प्रस्तावित असलेल्या या ‘आयपीओ’साठी प्रति समभाग ३६० ते ३८० रुपये किंमत निश्चित करण्यात आला आहे.
राजस्थानस्थित डॅनिश पॉवरने या माध्यमातून ५२.०८ लाख समभाग सार्वजनिक विक्रीसाठी खुले केले असून, त्यांची विक्री २४ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहिल. हेम सिक्युरिटीजकडून या भागविक्रीचे व्यवस्थापन पाहिले जात आहे. १९८५ मध्ये जयपूरमध्ये दोन उत्पादन सुविधांसह स्थापित, तलवार कुटुंबाच्या मालकीची ही कंपनी, इंडो टेक ट्रान्सफॉर्मर्स, शिलचर टेक्नॉलॉजीज आणि व्होल्टॅम्प ट्रान्सफॉर्मर्स सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करत आहे. टाटा पॉवर सोलर सिस्टीम, वारी रिन्युएबल्स, जॅक्सन ग्रीन, एबीबी इंडिया आणि टोरेन्ट पॉवर या सारख्या अनेक ग्राहकांना ती ट्रान्सफॉर्मर आणि पॅनेलचा पुरवठा करते.
हेही वाचा >>>‘सॅटकॉम’साठी स्पेक्ट्रम वाटपाच्या सरकारच्या भूमिकेने अंबानींविरोधात मस्क यांना झुकते माप
कंपनी फॅक्टरी शेड बांधण्यासाठी आणि अतिरिक्त प्रकल्प व तेथे यंत्रसामग्री स्थापित करण्यासाठी भागविक्रीतून प्राप्त निधीपैकी ३७ कोटी रुपये, तर खेळत्या भांडवलाच्या गरजांसाठी ८५ कोटी रुपयांचा वापर करेल. कर्जाच्या परतफेडीसाठी २० कोटी रुपये वापरले जाणार आहेत, ज्यायोगे कंपनी जवळपास कर्जमुक्त होणे अपेक्षित आहे.
सर्वात मोठी ‘एसएमई’ भागविक्री
विद्यमान २०२४ साल हे ‘एसएमई आयपीओ’साठी भलतेच बहारदार ठरले असून, गुंतवणूकदारांच्य विक्रमी प्रतिसादासह, कंपन्यांच्या निधी उभारणीचा आकारही लक्षणीय वाढला आहे. १०० कोटींहून अधिक निधी उभारणारे २०२४ सालात नऊ एसएमई कंपन्यांचे आयपीओ आले, सप्टेंबर २०२३ पर्यंत अशी कामगिरी करणारी केवळ एक कंपनी होती. डॅनिश पॉवरकडून १९७.९० कोटी रुपये अशी आजवरची सर्वात मोठी भागविक्री, तर या आधी मार्चमध्ये केपी ग्रीन इंजिनिअरिंगने १८९.५० कोटी रुपये असे तोवरची सर्वाधिक रक्कम ‘आयपीओ’तून उभारली आहे. सरलेल्या सप्टेंबरमध्ये सहस्र इलेक्ट्रॉनिक्स सोल्युशन्सने १८६.२० कोटी रुपये उभारले आहेत.