मुंबई: बँकिंग क्षेत्रातील प्रमुख जागतिक वित्तीय समूह ‘डीबीएस बँके’ने पुढील तीन वर्षांत कर्मचाऱ्यांची संख्या १० टक्क्यांनी कपातीचे नियोजन असल्याचे जाहीर केले. बँकेच्या विविध कार्यांमध्ये कृत्रिम प्रज्ञा (एआय) तंत्रज्ञानाचा खोलवर सुरू असलेला अवलंब हे नोकरकपातीमागील कारण आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी पीयूष गुप्ता यांनी सोमवारी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुप्ता म्हणाले की, एआय हे भूतकाळात स्वीकारल्या गेलेल्या इतर कोणत्याही तंत्रज्ञानापेक्षा वेगळे आहे आणि त्याची परिणामकारकताही खूप मोठी असेल. सिंगापूरस्थित या बँकेच्या १५ वर्षांहून अधिक कार्यकाळात नवीन नोकऱ्या निर्माण करण्याऐवजी, कपातीसाठी योजना करावी लागण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे.

देशाच्या माहिती-तंत्रज्ञान उद्योगाचे वार्षिक मंथन असलेल्या ‘नासकॉम’मधील एका परिसंवादात बोलताना, डीबीएसचे भारतातील मुख्य कार्यकारी अधिकारी पीयूष गुप्ता म्हणाले, ‘माझा सध्याचा अंदाज असा आहे की, पुढील तीन वर्षांत, आम्हाला आमच्या कर्मचाऱ्याची संख्या ४,००० किंवा १० टक्क्यांनी कमी करावी लागणार आहे.’ या मनुष्यबळ कपातीमागची कारणमीमांसा करताना, एआय हे असे शक्तिशाली तंत्रज्ञान आहे, ज्यात सृजन क्षमताही आहे आणि ते हुबेहूब (कामाची) नक्कल देखील करू शकते, असे त्यांनी नमूद केेले.

गेल्या १० वर्षांत समूहाकडून केव्हाही नोकर कपात केली गेलेली नाही, असे नमूद करून गुप्ता म्हणाले, २०१६-१७ मध्ये बँकेने डिजिटल परिवर्तन सुरू केले. ज्याच्या त्यावेळी १,६०० लोकांवर परिणाम झाला होता. परंतु त्यापैकी जवळजवळ सर्व जणांना संस्थेअंतर्ग चर्चा आणि इतर प्रतिनिधींशी सल्लामसलत करून पुन्हा वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांवर नियुक्त केले गेले. तथापि, एआयच्या युगातील सध्याचे आव्हान हे देखील कर्मचारी वर्गाचे पुनर्निर्माण कसे करायचे याभोवती फिरत आहे.

नंतर जारी करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनात डीबीएस बँकेने स्पष्ट केले की, पुढील तीन वर्षांत ४,००० कर्मचाऱ्यांची नियोजित कपात ही प्रामुख्याने कंत्राटी आणि तात्पुरत्या कर्मचाऱ्यांशी संबंधित असेल. सेवानिवृत्ती, दुसऱ्या ठिकाणी संधी म्हणून नोकरी सोडून जाणाऱ्यांमुळे देखील कर्मचारी वर्गात नैसर्गिक कपात होईल, असे बँकेने म्हटले आहे. येत्या काही वर्षांत तात्पुरत्या आणि कंत्राटी भूमिका सुरू होत असताना, एकूण पटावरील मनुष्यबळ कमी होईल.

डीबीएसने दोन वर्षांपूर्वी जनरेटिव्ह एआय सोल्यूशन्सची अंमलबजावणी सुरू केली आणि त्याचे संपूर्ण फायदे अद्याप दिसून आलेले नाहीत, असे गुप्ता म्हणाले. तथापि या नवतंत्रज्ञानावर पूर्णपणे अवलंबून राहण्याबाबत बँकेची सावध भूमिका आहे. सध्या समूहाकडून एआयचा व्यवसायातील वापर हा ग्राहकांशी संपर्क आणि समस्या निवारण, कर्ज मंजूरी व पत मूल्यांकन प्रक्रिया आणि भरती यांचा समावेश आहे, असे गुप्ता म्हणाले. २०१२-१३ मध्ये एआय तंत्रज्ञानाचा डीबीएसमधील प्रारंभिक अवलंब फारसा यशस्वी ठरला नव्हता.