रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी ईमेलद्वारे देण्यात आली आहे. मेलमध्ये ४०० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. धमकी पाहता पोलिसांनी अंबानींच्या घराची सुरक्षा वाढवली आहे. याबरोबरच सायबर पोलीस ईमेल पाठवणाऱ्यांचा शोध घेण्याचे काम करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याआधीही अंबानींना धमकीचा ईमेल आला होता. यानंतर सोमवारी सकाळी अंबानींना तिसऱ्यांदा धमकीचा मेल आला आहे. हा मेल त्याच आयडीवरून पाठवण्यात आला आहे. गेल्या मेलमध्ये २० कोटींची मागणी करण्यात आली होती. मात्र, यावेळी मेल पाठवणाऱ्याने खंडणीची रक्कम ४०० कोटी रुपयांपर्यंत वाढवली आहे. सध्या पोलीस ईमेल पाठवणाऱ्यांचा शोध घेत आहेत. मेल पाठवणाऱ्याने २७ ऑक्टोबरला असे दोन मेल पाठवून एकदा २० कोटी आणि दुसऱ्यांदा २०० कोटी रुपयांची मागणी केली होती. अंबानींनी मागील मेलला प्रतिसाद न दिल्याने त्यांनी तिसऱ्यांदा ही रक्कम वाढवून ४०० कोटी रुपये केली आहे.

हेही वाचाः नारायण मूर्तींच्या वक्तव्याला दुजोरा देत इन्फोसिसचे माजी सीएफओ म्हणाले; ” तो सल्ला फक्त ३० वर्षांखालील…”

तुमची सुरक्षा कितीही मजबूत असली तरीही…

हा मेल अंबानींच्या अधिकृत आयडीवर पाठवण्यात आला आहे. त्यावर लिहिले आहे की, “तुमची सुरक्षा कितीही मजबूत असली तरी आमचा एक स्नायपर तुम्हाला मारू शकतो. यावेळी ४०० कोटी रुपयांची मागणी आहे. पोलीस माझा माग काढू शकत नाहीत किंवा मला अटक करू शकत नाहीत.” या मेलनंतर मुंबई पोलिसांनी सोमवारी अंबानींच्या मुंबईतील घर अँटिलियाची सुरक्षा वाढवली आहे.

हेही वाचाः IT क्षेत्रावर मंदीचे ढग कायम; २५ वर्षांत पहिल्यांदाच कर्मचाऱ्यांची संख्या घटली, जाणून घ्या ‘कारण’

अंबानींना शुक्रवारी पहिला धमकीचा मेल आला. मेल पाठवणाऱ्याने त्याचे नाव शादाब खान असल्याचे म्हटले आहे. त्यांना जीवे मारण्याची धमकी देत २० कोटी रुपयांची मागणी केली. यानंतर अंबानींच्या घराच्या अँटिलियाची सुरक्षा पाहणारे देवेंद्र मुन्शीराम यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. अंबानींकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने दुसऱ्या दिवशी आरोपींनी त्यांना दुसरा ईमेल पाठवला आणि खंडणीची रक्कम दुप्पट केली. आता तिसऱ्यांदा ४०० कोटी रुपयांची मागणी केली आहे.

गावदेवी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३८७ (एखाद्या व्यक्तीला मृत्यूची भीती किंवा गंभीर दुखापत) आणि ५०६ (२) (गुन्हेगारी धमकीची शिक्षा) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस मेल पाठवणाऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Death threat to mukesh ambani for the third time 400 crores demanded by email vrd
Show comments