मुंबई: माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी विप्रो लिमिटेड भागधारकांना बक्षीस (बोनस) समभाग देण्याची योजना आखत असून, येत्या गुरुवारी, १७ ऑक्टोबरला जुलै-सप्टेंबर कालावधीतील तिमाही कामगिरी लक्षात घेण्यासाठी होत असलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावावरही निर्णय घेतला जाणार आहे, असे कंपनीने आघाडीच्या बाजारमंचांना कळवले आहे.
निकालांसोबतच, विप्रो बक्षीस समभाग जाहीर करण्याची शक्यता आहे. कंपनीने बक्षीस समभाग घोषित केल्यास, भागधारकांना बक्षीस समभाग देण्याची ही तिची १४ वी वेळ असेल. आघाडीच्या ५० कंपन्यांमध्ये सर्वाधिक वेळा बक्षीस समभाग देणारी ती कंपनी ठरेल. गेल्या वर्षी एप्रिल २०२३ मध्ये विप्रोच्या संचालक मंडळाने १२,००० कोटी रुपयांच्या समभाग पुनर्खरेदी (बायबॅक) योजनेला मंजुरी दिली होती.
हेही वाचा >>>Gold Silver Rate : दसऱ्यानंतर सोने चांदीचे भाव घसरले, सोने खरेदी करायचा विचार करताय? जाणून घ्या आजचा भाव
मंगळवारच्या सत्रात विप्रोचा समभाग ३.०२ टक्के म्हणजेच १६.६० रुपयांनी घसरून ५३२.९५ रुपयांवर व्यवहार करत स्थिरावला. सध्याच्या समभागांच्या बाजारभावानुसार कंपनीचे २.७८ लाख कोटींचे बाजार भांडवल आहे.