वृत्तसंस्था, हाँगकाँग
चीनमधील निर्मिती क्षेत्राचा वेग चार महिन्यांनंतर जानेवारीत पुन्हा मंदावला असून, तेथे नववर्षाच्या सुट्या सुरू झाल्याने कामगार त्यांच्या मूळगावी तो साजरे करण्यासाठी गेल्याने घसरलेल्या उत्पादनाचा हा परिणाम सांगितला जात आहे.
चीनच्या राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने निर्मिती क्षेत्रातील खरेदी व्यवस्थापकांचा कल जोखणाऱ्या सर्वेक्षणावर आधारित (पीएमआय) निर्देशांक सोमवारी जाहीर केला. हा निर्देशांक जानेवारीत ४९.१ गुणांवर उतरला आहे. आधीच्या महिन्यात तो ५०.१ गुणांवर होता. पीएमआय निर्देशांक ५० गुणांवर विस्तारपूरकता दर्शवतो आणि तो ५० गुणांखाली गेल्यास आकुंचन मानले जाते. बांधकाम आणि सेवा क्षेत्राचा समावेश असलेला बिगर-निर्मिती क्षेत्राचा पीएमआय निर्देशांकही जानेवारीत कमी होऊन ५०.२ गुणांवर आला आहे. त्याआधीच्या महिन्यात तो ५२.२ गुणांवर होता.
चीनमध्ये चांद्र नववर्षाच्या सुट्या सुरू झाल्यामुळे पीएमआय निर्देशांकात घट झाल्याचे सांख्यिकी विभागाने म्हटले आहे. चांद्र नववर्ष हा चीनमध्ये खूप मोठा सार्वजनिक उत्सव असतो. त्याची सुरूवात मंगळवारपासून (२८ जानेवारी) होत असून, तो ४ फेब्रुवारीपर्यंत सुरू असेल. या उत्सवाच्या निमित्ताने चीनमध्ये कोट्यवधी कामगार हे शहरांतून मूळगावी त्यांच्या कुटुंबीयांकडे जातात. त्यामुळे या काळात आर्थिक घडामोडींचा वेग कमी होतो. चीनच्या निर्मिती क्षेत्रात घट होत असताना निर्यातीबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून चीनच्या उत्पादनांवर जादा शुल्क लावल्यास निर्यातीला लक्षणीय फटका बसणार आहे.
विकास दर ५ टक्के
चीनच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर २०२४ मध्ये ५ टक्के राहिला आहे. सरकारने निश्चित केलेल्या उद्दिष्टाएवढा तो आहे. भक्कम निर्यात आणि सरकारने उचललेल्या अर्थ-प्रोत्साहक पावलांमुळे विकास दरातील वाढ कायम राहिली. या महिन्यात निर्मिती क्षेत्राचा वेग मंदावला असला, तरी आगामी काळात तो पुन्हा वाढेल. मात्र, पीएमआय निर्देशांकात झालेली घसरण ही धोरणकर्त्यांसाठी विकासदरातील वाढ कायम राखण्यासाठी आव्हान ठरेल, अशी माहिती अर्थतज्ज्ञ झिचुआन हुआंग यांनी दिली.