पीटीआय, नवी दिल्ली
सरलेल्या एप्रिल महिन्यात किरकोळ महागाई दरात घसरण दिसून आली. मागील महिन्यात किरकोळ महागाईचा दर ४.७० टक्क्यांवर खाली आला आहे. अन्नधान्याची महागाई कमी झाल्याने ही घट झाल्याचे सरकारने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. ही मागील १८ महिन्यांतील नीचांकी पातळी आहे.
राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने किरकोळ किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दराची आकडेवारी शुक्रवारी जाहीर केली. मार्च महिन्यात किरकोळ महागाई दर ५.६६ टक्क्यांवर नोंदवण्यात आला. आता सलग दुसऱ्या महिन्यात हा दर ६ टक्क्यांच्या खाली आला आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्यात किरकोळ महागाईचा दर ७.७९ टक्के होता. तो आता ऑक्टोबर २०२१ नंतरच्या नीचांकी पातळीवर घसरला आहे. त्या वेळी हा दर ४.४८ टक्के होता.
अन्नधान्य आणि इंधनाच्या दरात झालेली घसरण महागाई दर कमी होण्यास कारणीभूत ठरली आहे. तृणधान्ये आणि भाज्यांच्या भावातील घट आणि कमी झालेले ऊर्जादरही यासाठी पूरक ठरले आहेत. एप्रिलमध्ये अन्नधान्याच्या महागाईत घट होऊन ती ३.८४ टक्क्यांवर आली. मार्चमध्ये ती ४.७९ टक्के आणि मागील वर्षी एप्रिलमध्ये ८.३१ टक्के होता.
आणखी वाचा-अदानी चौकशीसाठी सेबीला ३ महिन्यांची मुदत?
किरकोळ महागाईचा दर डिसेंबर २०२२ मध्ये ५.७ टक्के होता. तो वाढत वाढत फेब्रुवारी २०२३ मध्ये ६.४ टक्क्यांवर पोहोचला. तृणधान्ये, दूध, फळांच्या महागाईत वाढ आणि भाज्यांच्या महागाईत संथपणे होत असलेली घसरण यामुळे किरकोळ महागाईत वाढ नोंदवण्यात आली होती. आता त्यात पुन्हा घट होऊ लागली आहे.
बँकांच्या कर्जाच्या व्याजदराला प्रभावित करणारा ‘रेपो दर’ ठरविताना रिझर्व्ह बँकेकडून किरकोळ महागाई दराची पातळी विचारात घेतली जाते. मध्यवर्ती बँकेसाठी हा दर २ ते ६ टक्क्यांच्या पातळीदरम्यान नियंत्रित करण्याचे दायित्व असून, तूर्त तो कमाल मर्यादेच्या आत परतणे दिलासादायी आहे. विद्यमान २०२३-२४ आर्थिक वर्षांसाठी किरकोळ महागाईचे दरासंबंधी अंदाज वर्तविताना ते ५.२ टक्के राहील, असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज आहे.
ग्रामीण महागाईतही घट
ग्रामीण भागातील महागाई ४.६८ टक्के आणि शहरी महागाई ४.८५ टक्के आहे. भाज्यांची महागाई कमी होऊन ती ६.५० टक्क्यांवर आली आहे. देशातील ग्रामीण महागाई ही सलग तीन तिमाहींमध्ये ६ टक्क्यांच्या वर होती. ती नोव्हेंबर २०२२ पासून ६ टक्क्यांच्या खाली घसरली.