अनेकदा कर्मचाऱ्यांच्या एका छोट्याश्या चुकीमुळे कंपनीला मोठा दंड भरावा लागतो. जेव्हा एखादा कर्मचारी चूक करतो, तेव्हा त्याला काय झालं हे समजत नाही. पण, ग्राहक तीच चूक पकडून कंपनीला जाब विचारते. परिणामी एका चुकीमुळे कंपनीचे नुकसान होते. अशाप्रकारे सुप्रसिद्ध फॅशन ब्रँड ‘लाइफस्टाइल’ला तिच्या कर्मचाऱ्यांच्या एका छोट्याशा चुकीमुळे तीन हजार रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. चूक अशी की, बिल बनवताना कर्मचाऱ्याने सात रुपये किमतीची कागदी पिशवी ग्राहकाला दिली. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, यात नवीन काय आहे? ती द्यावीच लागते. पण त्याचे झाले असे की, या कर्मचाऱ्याने ग्राहकाने पिशवी मागितली नाही तरी दिली आणि त्याचे पैसे ग्राहकाकडून घेतले, ज्यामुळे अडचण निर्माण झाली.
म्हणजे ग्राहकाला त्याच्या नकळत माल विकला गेला, जे चुकीचे आहे. अशी तक्रार ग्राहकाने केली. या एका चुकीमुळे लाइफस्टाइलला दंड भरावा लागला.
घटना डिसेंबर २०२० मध्ये घडली होती. अनमोल मल्होत्रा असे तक्रारदार ग्राहकाचे नाव आहे. त्याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्याच्या नकळत कर्मचाऱ्याने कागदी पिशवी दिली आणि त्याचे पैसेही आकारले गेले, लाइफस्टाइलने त्याच्याकडून अतिरिक्त शुल्क घेतले, ज्यामुळे त्याचा खरेदीचा अनुभव खराब झाला.
हे प्रकरण नंतर दिल्ली ग्राहक विवाद निवारण आयोग (DCDRC) पर्यंत पोहोचले. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, सुनावणीदरम्यान आयोगाने सांगितले की, लाइफस्टाइल अशाप्रकारे कॅरी बॅगसाठी पैसे आकारू शकत नाही. विशेषत: त्याच शोरूममधून खरेदी केलेल्या वस्तूंसाठी तर नाहीच. यासाठी ग्राहकाकडून शुल्क आकारणे म्हणजे सेवेतील कमतरता आहे.
डीसीडीआरसीने म्हटले आहे की, अशा गोष्टी पेमेंटच्या वेळी ग्राहकाला त्रास देतात आणि त्याच्यावर अतिरिक्त खर्चाचा भार टाकतात. आउटलेट निवडणे किंवा न निवडण्याबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेण्याच्या अधिकारांवरदेखील याचा परिणाम होतो. अशाप्रकारे डीसीडीआरसीने फॅशन ब्रँड लाइफस्टाइल इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडला ग्राहकाला पूर्वसूचना न देता कागदी कॅरी बॅगसाठी सात रुपये आकारल्याबद्दल तीन हजार रुपये दंड भरण्याचे निर्देश दिले आहेत.