जागतिक पातळीवर AI अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सची क्रांती आणि धसका पाहायला मिळत आहे. एआय तंत्रज्ञानामुळे असंख्य गोष्टी फक्त एका कमांडच्या सहाय्याने मशीनकडून करवून घेता येत असून त्याचवेळी या असंख्य गोष्टी करणाऱ्या नोकरदार वर्गावर नोकरी गमावण्याचं संकट घोंगावू लागलं आहे. गेल्या काही महिन्यांत जगभरात अनेक ठिकाणी कर्मचारी कपात करण्यात आली आहे. आता Dell या तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी कंपनीनं तब्बल १२ हजार ५०० अर्थात त्यांच्या जगभरातील एकूण कर्मचारी संख्येच्या तब्बल १० टक्के कर्मचारी कपात केली आहे. त्यामुळे AI तंत्रज्ञान खरंच हवं की नको? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
डेल कंपनीनं ६ ऑगस्ट रोजी यासंदर्भातलं एक सर्क्युलर सर्व कर्मचाऱ्यांना पाठवलं आहे. मिंटनं बिझनेस इनसायडरच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. ‘Global Sales Modernization Update’ असं या सर्क्युलरवर लिहिलं असून कंपनीचे सीनिअर एक्झिक्युटिव्ह बिल स्कॅनेल व जॉन बायर्न यांच्या नावानिशी हे सर्क्युलर काढण्यात आल्याचं वृत्तात म्हटलं आहे.
कंपनीकडून सर्क्युलर, कर्मचाऱ्यांना दिली माहिती
आपली गुंतवणूक कुठे व्हावी यासंदर्भात धोरणात बदल केले जात असून व्यवस्थापनाच्या स्तरावर ही धोरणं अंमलात आणली जात असल्याचं या सर्क्युलरमध्ये नमूद करण्यात आलं आहे. Dell कडून करण्यात आलेली ही कर्मचारी कपात प्रामुख्याने मधल्या फळीतील असल्याचं बोललं जात आहे. त्यात व्यवस्थापक, वरीष्ठ व्यवस्थापक आणि काही २० वर्षांचा अनुभव असणारे जुने कर्मचारी यांचा समावेश असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.
AI साठी धोरण बदललं?
दरम्यान, एआय तंत्रज्ञानामुळेच कंपनीकडून धोरणात बदल करण्यात आला असून कर्मचारी कपातीचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. कर्मचारी कपात करून काही विभागांमध्ये एआय तंत्रज्ञानावर आधारित कामाचं स्वरूप ठरवण्याच्या हालचाली सुरू झाल्याचीही चर्चा आहे.
कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना ‘एक्झिट पॅकेज’?
नोकरीवरून कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना डेल कंपनीकडून पॅकेजेस देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्यात दोन महिन्यांचा पगार देऊ केल्याची चर्चा आहे. मात्र, अनेक अनुभवी जुन्या कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
गेल्या वर्षीदेखील डेल कंपनीने जगभरातून १३ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं होतं. त्यामुळे गेल्या १५ महिन्यांतही ही डेल कंपनीतली दुसरी कर्मचारी कपात असल्याचं इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. त्यामुळे एकूणच जागतिक बाजारपेठेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा मोठा फटका रोजगाराला बसत असल्याची भूमिका मांडली जात आहे.