मुंबईः अलिकडच्या काळात देशी तसेच जागतिक बाजारपेठेने आव्हाने निर्माण केली असली तरी नैसर्गिक हिऱ्यांबाबत आकर्षणाचा कल दीर्घावधीत आश्वासक दिसून येतो आणि भारतातील रत्न-आभूषणांच्या बाजारपेठेत सध्या १० टक्क्यांपेक्षाही कमी असलेली नैसर्गिक हिऱ्यांचा वाटा तीन-चार वर्षांत १५ टक्क्यांवर गेलेला दिसेल, असा आशावाद डी बीअर्स य़ा जागतिक कंपनीने बुधवारी व्यक्त केला.

अमेरिकेनंतर जगातील नैसर्गिक हिऱ्यांचा दुसरा मोठा ग्राहक असलेल्या भारतात आगामी दशकभरात ग्राहकांच्या मागणीत दुप्पट वाढ होईल, असा विश्वास डी बीअर्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अमित प्रतिहारी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. आधुनिक दागिने विक्री दालनांच्या संख्येतील वाढ, त्यात सजणारा हिरेजडित दागिन्यांचा मोठा विभाग आणि नैसर्गिक हिऱ्याचे दागिन्यांतील वापराशी ग्राहकांचे असलेले भावनिक आणि सांस्कृतिक नाते पाहता ही वाढ शक्य आहे.

म्हणूनच २०३० पर्यंत १२० अब्ज डॉलरच्या रत्न व आभूषण बाजारपेठेत हिऱ्यांचा वाटा १८ अब्ज डॉलरपर्यंत वाढलेला दिसून येईल, असे प्रतिहारी म्हणाले. डी बीअर्सने मोठ्या कालावधीनंतर भारतात हिरेजडित आभूषण उद्योगाला चालना देणारी व्यापक जाहिरात मोहिम ‘लव्ह फ्रॉम डॅड’ या नावाने सुरू करत असल्याची बुधवारी घोषणा केली. भारतीय परंपरेप्रमाणे १२ ते १६ वर्षे किशोरवयीन मुलींच्या कर्णवेध (कान टोचण्याच्या) सोहळ्यानिमित्त पित्याकडून तिला अमू्ल्य भेट देणाऱ्या आभूषणांचे संग्रहणाला प्रोत्साहित करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.

देशभरात जीजेईपीसी या सराफांच्या संघटनेशी सामंजस्यातून प्रस्तुत ‘इंडियन नॅचरल डायमंड रिटेलर्स अलायन्स (इंद्रा)’ व्यासपीठाच्या माध्यमातून अगदी छोट्या शहरातही अस्सल हिऱ्यांचे दागिने पाच हजार रुपयांपासून पुढील किमतीत उपलब्ध होतील. तनिष्क तसेच डी बीअर्सच्या फॉरएव्हरमार्क दालनांतही ती उपलब्ध असतील. त्यासाठी पूरक जाहिरात मोहिम मुद्रीत, डिजिटल, रेडिओ, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे तसेच समाजमाध्यमातून वर्षभर सुरू राहिल. प्रचंड मोठ्या गुंतवणुकीसह राबविल्या जाणाऱ्या या मोहिमेचा व्यावसायिक लाभ देशभरातील ‘इंद्रा’ व्यासपीठावरील ३० हजारांहून अधिक सराफांनाही मिळेल, असे प्रतिहारी म्हणाले.