मुंबई : भूजल पुनर्भरण प्रकल्पांमध्ये तज्ज्ञता असलेल्या आणि जल व्यवस्थापन पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या रचना, स्थापना आणि प्रकल्प कार्यान्वयनाच्या क्षेत्रात कार्यरत डेंटा वॉटर ॲण्ड इन्फ्रा सोल्युशन्स लिमिटेडने प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) प्रस्तावित केली आहे. या माध्यमातून कंपनी २२०.५ कोटी रुपये उभारले जाणे अपेक्षित आहे.
वेगाने वाढ साधत असलेल्या जल व्यवस्थापन पायाभूत सुविधेसंबंधी उपापयोजनेच्या क्षेत्रात कार्यरत कंपनी डेंटा वॉटरने प्रारंभिक सार्वजनिक विक्रीसाठी तिच्या १० रुपये दर्शनी मूल्याच्या प्रत्येक समभागासाठी २७९ रुपये ते २९४ रुपये असा किंमत पट्टा निश्चित केला आहे.
हेही वाचा : बिटकॉईनला विक्रम झळाळी, किंमत लाख डॉलरपार
कंपनीचा ‘आयपीओ’ येत्या बुधवारी, २२ जानेवारीला गुंतवणुकीसाठी खुला होईल आणि शुक्रवार, २४ जानेवारीला तो बंद होईल. गुंतवणूकदार किमान ५० समभागांसाठी आणि त्यानंतर ५० समभागांच्या पटीत या आयपीओमध्ये बोली लावू शकतील. हा आयपीओ पूर्णपणे ७५ लाख भागभांडवली समभागांच्या नव्याने विक्रीचा आहे ज्यामध्ये कंपनीच्या प्रवर्तक आणि विद्यमान गुंतवणूकदारांकडून विक्रीसाठी कोणताही हिस्सा प्रस्तावित नाही. आयपीओमध्ये किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी ३५ टक्के हिस्सा राखीव आहे. आयपीओच्या माध्यमातून उभारले जाणाऱ्या २२०.५० कोटींपैकी, १५० कोटी रुपये हे खेळत्या भांडवलाची गरज म्हणून कंपनीकडून वापरात येतील.