लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई: नागरी सहकारी बँकांनी जबाबदाऱ्यांबाबत जागरूकतेसह, विशेषतः ठेवीदारांनी दाखवलेल्या विश्वासास त्या पात्र राहतील हे पाहावे, असे आवाहन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी बुधवारी केले.

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेतील उघडकीस आलेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर, संपूर्ण नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राबद्दलच प्रश्नचिन्ह उभे राहिले असताना, गव्हर्नर मल्होत्रा यांनी बोलावलेल्या विशेष बैठकीत वरील विधान केले. निवडक नागरी सहकारी बँकांच्या प्रमुखांशी तसेच नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (एनयूसीएफडीसी) आणि नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स अँड क्रेडिट सोसायटीज लिमिटेड (नॅफकब) या शिखर संस्थाच्या प्रतिनिधींशी त्यांनी या निमित्ताने संवाद साधला. ही बैठक रिझर्व्ह बँकेच्या नियमनाधीन संस्थांसह संवाद मालिकेचा एक भाग म्हणून योजण्यात आली होती.

बैठकीदरम्यान, नागरी सहकारी बँकांच्या वाढीसाठी प्रयत्नशीलतेसह, या क्षेत्राला पाठिंबा देण्याच्या रिझर्व्ह बँकेच्या भूमिकेचा मल्होत्रा यांनी पुनरूच्चार केला. तसेच ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आणि तो टिकवून ठेवण्यासाठी नागरी सहकारी बँकांनी ग्राहक सेवेची सर्व मानकांचे पालन करावे. शिवाय बँकांनी माहिती-तंत्रज्ञान आणि सायबर सुरक्षेसंबंधी जोखमींपासून बचावासाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करणे आवश्यक आहे, असे मल्होत्रा म्हणाले.

तळागाळात आर्थिक समावेशनाला चालना देण्यासाठी सहकारी बँकांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे मल्होत्रा यांनी कौतुक केले. या क्षेत्रासमोरील नियामक आणि कार्यात्मक आव्हानांबाबत सूचना देखील त्यांनी मागवल्या. या बैठकीमध्ये रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एम राजेश्वर राव आणि स्वामीनाथन जे, नियमन आणि पर्यवेक्षण देखरेख करणारे कार्यकारी संचालक देखील उपस्थित होते.

Story img Loader