नवी दिल्ली: चालू आर्थिक वर्षात डिसेंबरअखेरपर्यंत इंटरनेट, कार्ड आणि डिजिटल देयक व्यवहारांच्या माध्यमातून नागरिकांची १०७ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सोमवारी संसदेत दिली. मागील वर्षाच्या तुलनेत फसवणुकीची रक्कम घटली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभेत लेखी उत्तरादाखल चौधरी यांनी म्हटले की, देशात आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये इंटरनेट, कार्ड आणि डिजिटल व्यवहारांच्या माध्यमातून नागरिकांची १७७ कोटी रुपयांची फसवणूक झाली होती. त्यातील २९,०८२ प्रकरणांमध्ये १ लाख अथवा त्यापेक्षा जास्त रकमेची फसवणूक झाली. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत अशा प्रकारची फसवणुकीची १३ हजार ३८४ प्रकरणे घडली असून, त्यात नागरिकांना १०७ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. देशात डिजिटल व्यवहारांचे प्रमाण वाढत असून, त्यातून होणाऱ्या फसवणुकीचे प्रकारही वाढू लागले असले तरी त्यायोगे होणाऱ्या नुकसानीची रक्कम कमी झाली आहे.

देशात आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये डिजिटल व्यवहारांच्या माध्यमातून फसवणुकीची ६ हजार ६९९ प्रकरणे घडली होती आणि त्यात ६९ कोटी रुपयांचा फटका बसला होता. त्याआधी २०२१-२२ मध्ये अशा प्रकारच्या फसवणुकीची ३ हजार ५९६ प्रकरणे घडली होती आणि त्यात ८० कोटी रुपयांचा फटका बसला होता. डिजिटल व्यवहारांच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीची प्रकरणे रोखण्यासाठी जनजागृती मोहिमेवर भर दिला जात आहे. सायबर गुन्ह्यांबाबत जनतेला जागरूक केले जात आहे, असेही चौधरी यांनी स्पष्ट केले.