लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : सरलेल्या आर्थिक वर्षातील सप्टेंबर २०२४ अखेरपर्यंत देशभरातील डिजिटल व्यवहारांमध्ये वार्षिक आधारावर ११.११ टक्क्यांची वाढ झाली आहे. ऑनलाइन व्यवहारांचा अवलंब मोजणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांकावरून ही माहिती प्राप्त झाली आहे.
रिझर्व्ह बँकेचा डिजिटल पेमेंट इंडेक्स (आरबीआय-डीपीआय) सप्टेंबर २०२४ साठी ४६५.३३ वर आहे, जो मार्च २०२४ मध्ये ४४५.५ होता, असे रिझर्व्ह बँकेने बुधवारी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या कालावधीत देशभरातील डिजिटल पायाभूत सुविधा आणि व्यवहारातील वाढीमुळे आरबीआय-डीपीआय निर्देशांकात वाढ झाली असल्याचे मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे. देशभरातील ऑनलाईन माध्यमातून पार पडणाऱ्या व्यवहारांच्या डिजिटायझेशनची व्याप्ती मोजण्यासाठी आधार म्हणून मध्यवर्ती बँकेने मार्च २०१८ मध्ये संयुक्त आरबीआय-डीपीआय तयार करण्याची घोषणा केली होती.
जागतिक पातळीवर भारताची आघाडी
रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार, जगातील डिजिटल व्यवहारांत ४८.५ टक्के वाट्यासह भारत आघाडीवर आहे. मोबाईल आणि डिजिटल मंचाच्या माध्यमातून जागतिक पातळीवरून मायदेशी पैसे पाठविण्याचे प्रमाण वाढले असून, २०२३ मध्ये ही रक्कम ८५७.३ अब्ज डॉलरवर गेली आहे. भारताने यात आघाडी मिळवून, २०२३ मध्ये ही रक्कम ११५.३ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. सध्या भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) डिजिटल अर्थव्यवस्थेचे प्रमाण एक दशांश आहे. मागील दशकभरातील वाढीचा विचार करता हे प्रमाण २०२६ पर्यंत एक पंचमांशांपर्यंत वाढेल.