वृत्तसंस्था, नवी दिल्ली
देशातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीच्या विरोधात अमेरिकेतील समान रोजगार संधी आयोगाने चौकशी सुरू केली आहे. अमेरिकेतील कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या विरोधात तक्रार केली असून, वंश, वय आणि राष्ट्रीयतेच्या मुद्द्यावर कंपनीने भेदभाव केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
टीसीएसविरोधात तक्रार करणारे कंपनीचे माजी कर्मचारी असून, ते बिगर दक्षिण आशियाई पार्श्वभूमी असलेले आणि ४० वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. कंपनीने कपात करताना या कर्मचाऱ्यांना लक्ष्य केले, परंतु भारतीय कर्मचाऱ्यांना काढले नाही. हे भारतीय कर्मचारी एच-१बी व्हिसावर कार्यरत होते, त्यामुळे २०२३ पासून या कर्मचाऱ्यांनी टीसीएसच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत.
आयोगाच्या प्रतिनिधी अमेरिकी कायद्यांकडे बोट दाखवून या चौकशीवर बोलण्यास नकार दिला. अमेरिकेतील कायद्यानुसार आयोगाकडील तक्रारी या गोपनीय स्वरूपाच्या असतात. आयोगाकडे टीसीएसच्या सुमारे दोन डझनहून अधिक कर्मचाऱ्यांनी तक्रारी दिल्या आहेत. या प्रकरणाची चौकशी ज्यो बायडन हे अमेरिकेचे अध्यक्षपदी असतानाच सुरू झाली होती. आता ट्रम्प हे अध्यक्षपदी आल्यानंतरही ही चौकशी सुरू आहे.
ब्रिटनमध्येही अशाच तक्रारी
ब्रिटनमध्येही टीसीएसविरोधात अशा स्वरूपाच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. कंपनीच्या ३ माजी कर्मचाऱ्यांनी रोजगार न्यायाधिकरणाकडे या तक्रारी केल्या होत्या. कंपनीने २०२३ मध्ये वय आणि राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर कर्मचारी कपात केली होती, असा आरोप यात करण्यात आला होता. त्या वेळी टीसीएसने हे न्यायाधिकरणासमोर केलेल्या उत्तरात हा आरोप फेटाळला होता.
टीसीएसच्या विरोधातील भेदभावाचे आरोप तथ्यहीन आणि दिशाभूल करणारे आहेत. सर्वांना संधी देण्याचे काम कंपनीने सुरुवातीपासून केले आहे. कंपनीकडून आपल्या कार्यपद्धतीत कायम मूल्यांना स्थान दिले गेले आहे.
प्रवक्ता, टीसीएस