नवी दिल्ली, पीटीआय
जहाजबांधणी क्षेत्रातील केंद्र सरकारच्या मालकीची कंपनी- कोचीन शिपयार्ड लिमिटेडच्या ५ टक्क्यांपर्यंत भागभांडवलाची सरकारकडून आंशिक समभाग विक्रीच्या अर्थात ‘ओएफएस’च्या माध्यमातून विक्री केली जाणार आहे. १६ आणि १७ ऑक्टोबर अशी दोन दिवस चालणाऱ्या या भागविक्रीसाठी प्रति समभाग १,५४० रुपयांची किंमत निश्चित करण्यात आली आहे.

संस्थात्मक गुंतवणूकदारांना १६ ऑक्टोबरला या भागविक्रीत सहभागी होऊन बोली लावता येईल. तर १७ ऑक्टोबरला किरकोळ गुंतवणूकदार आणि कंपनीचे कर्मचारी या समभाग विक्रीत बोली लावू शकतील, असे गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग अर्थात दीपमचे सचिव तुहिन कांता पांडे यांनी सांगितले. मंगळवारच्या सत्रातील १,६७२ या बाजारभावाच्या तुलनेत १३० रुपयांच्या म्हणजेच ८ टक्क्यांच्या सवलतीने हे समभाग खरेदी करता येणार आहेत.

हेही वाचा >>>Gold Silver Rate : दसऱ्यानंतर सोने चांदीचे भाव घसरले, सोने खरेदी करायचा विचार करताय? जाणून घ्या आजचा भाव

सुरुवातीला केंद्र सरकार २.५ टक्के हिस्सा विक्री करणार असून त्याअंतर्गत ६५.७७ लाख समभाग विकले जाणार आहेत. कंपनीने अतिरिक्त २.५ टक्के विक्रीचा पर्याय खुला ठेवला आहे. म्हणजेच या निर्गुंतवणुकीतून, प्रति समभाग १,५४० रुपयांप्रमाणे ५ टक्के हिस्सा विकून सरकारी तिजोरीत २,००० कोटी रुपयांची भर पडणे अपेक्षित आहे. मुंबई शेअर बाजारात मंगळवारच्या सत्रात कोचीन शिपयार्डचे समभाग ३.०४ टक्क्यांनी वधारून १,६७२ रुपयांवर स्थिरावले. कोचीन शिपयार्डमध्ये केंद्र सरकारची सध्या ७२.८६ टक्के हिस्सेदारी आहे.