नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये भागधारकांच्या पदरी २७,८३० कोटी रुपये रुपयांचा लाभांश दिला आणि आधीच्या वर्षाच्या तुलनेत त्यात ३३ टक्क्यांची झालेली वाढ ही बँकांच्या आर्थिक आरोग्यमानांत सुधारणा झाल्याचे दर्शविते.

सरकारी आकडेवारीनुसार, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी २०२३-२४ मध्ये भागधारकांना २७,८३० कोटी रुपयांचा लाभांश वितरित केला, जो आधीच्या आर्थिक वर्षात २०,९६४ कोटी रुपये होता. ज्यात ३२.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एकूण २७,८३० कोटी रुपयांच्या लाभांशापैकी, केंद्र सरकारला बँकांमधील हिस्सेदारी म्हणून एकूण लाभांशाच्या ६५ टक्के म्हणजेच १८,०१३ कोटी रुपयांचा लाभांश प्राप्त झाले आहेत.

आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये, स्टेट बँकेने सरकारी तिजोरीत सर्वाधिक १३,८०४ कोटी रुपये लाभांशरूपाने योगदान दिले. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये १२ सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी १.०५ लाख कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता, तर २०२३-२४ मध्ये त्यांनी १.४१ लाख कोटी रुपयांचा आतापर्यंतचा सर्वाधिक एकूण निव्वळ नफा नोंदवला आणि चालू आर्थिक वर्षाच्या नऊ महिन्यांत त्यांनी १.२९ लाख कोटी रुपये कमावले आहेत.

बाजार मंचांकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२४ मध्ये मिळालेल्या १,४१,२०३ कोटी रुपयांच्या सरकारी बँकांच्या एकत्रित नफ्यांत, स्टेट बँकेचा ४० टक्क्यांहून अधिक वाटा राहिला. स्टेट बँकेने ६१,०७७ कोटी रुपयांचा नफा कमावला, जो मागील आर्थिक वर्षापेक्षा २२ टक्के जास्त आहे (५०,२३२ कोटी रुपये).

टक्केवारीच्या बाबतीत, दिल्लीस्थित पंजाब नॅशनल बँकेचा निव्वळ नफा २२८ टक्क्यांनी वाढून ८,२४५ कोटी रुपये झाला, त्यापाठोपाठ युनियन बँकेचा क्रमांक लागतो, जिचा नफा ६२ टक्क्यांनी वाढून १३,६४९ कोटी रुपये झाला. ज्या बँकांच्या निव्वळ नफ्यात ५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली, त्यात बँक ऑफ इंडियाचा नफा ५७ टक्क्यांनी वाढून ६,३१८ कोटी रुपये, तर बँक ऑफ महाराष्ट्रचा नफा ५६ टक्क्यांनी वाढून ४,०५५ कोटी रुपये आणि चेन्नईस्थित इंडियन बँकेचा नफा ५३ टक्क्यांनी वाढून ८,०६३ कोटी रुपये झाला. आर्थिक वर्ष २०१८ मध्ये ८५,३९० कोटी रुपयांच्या विक्रमी तोट्यापासून आर्थिक वर्ष २०२४ मध्ये विक्रमी नफ्यापर्यंत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या आर्थिक कामगिरीत उत्तम वाढ दिसली आहे.