केंद्राच्या ‘मेक इन इंडिया’ धोरणाअंतर्गत पुढील १८ महिन्यांमध्ये (डिसेंबर २०२४) देशात पहिली सेमीकंडक्टर चिप उत्पादित होईल. तब्बल ४० वर्षांच्या प्रयत्नांनंतर भारतात सेमीकंडक्टर चिप निर्मिती केंद्र उभे राहणार असल्याची माहिती माहिती व तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी भाजप मुख्यालयातील पत्रकार परिषदेत दिली.
मोबाइल, कार, रेल्वे, संरक्षण उपकरण, कॅमेरे, लॅपटॉप, इलेक्ट्रिक वाहने, दूरसंचार उपकरणे आदी उत्पादनांमध्ये सेमीकंडक्टर चीप वापरल्या जातात. पोलाद आणि रसायन आदी उद्योगांप्रमाणे सेमीकंडक्टर हेदेखील मूलभूत उद्योग क्षेत्र आहे. सेमीकंडक्टर चिप उत्पादन करणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या पाच कंपन्यांपैकी ‘मायक्रॉन टेक्नॉलॉजी’ ही कंपनी गुजरातमधील साणंद इंडस्ट्रीयल पार्कमध्ये (गुजरात उद्योग विकास महामंडळ) उत्पादन केंद्र उभे करणार आहे. त्यासाठी मायक्रॉनने ८२ कोटी ५० लाख डॉलरची (सुमारे ६,७६९ कोटी रुपये) गुंतवणूक करणार आहे. या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मेहरोत्रा यांनी गेल्या गुरुवारी अमेरिकेत पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. त्यानंतर कंपनीने ही पहिल्यांदाच भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला.
केंद्रातील तत्कालीन काँग्रेस सरकारच्या काळात १९८० पासून देशात सेमीकंडक्टर चिपच्या उत्पादनासाठी प्रयत्न केले जात होते. पण, सेमीकंडक्टर चिपच्या उत्पादनासाठी अत्याधुनिक व पायाभूत सुविधा भारतात नव्हत्या. त्यामुळे काँग्रेसला सेमीकंडक्टर चिप निर्मितीतील कंपन्या देशात आणता आल्या नाहीत. या चिप तयार करण्यासाठी अव्याहत विजेचा पुरवठा करावा लागतो, एखादा सेंकद जरी वीजपुरवठा खंडीत झाला तर प्रचंड नुकसान होते. गेल्या नऊ वर्षांमध्ये भारताने मूलभूत सुविधा क्षेत्रात मोठी प्रगती केली असल्याने मायक्रॉनसारख्या जागतिक कंपन्या आता विश्वासाने देशात गुंतवणूक करू लागल्या आहेत, असे वैष्णव यांनी सांगितले.
साणंदमधील प्रकल्प दोन टप्प्यात कार्यान्वित होणार असून याच वर्षी प्रकल्प उभारणीचे काम सुरू होईल. सेमीकंडक्टर कंपनी भारतात आल्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन कंपन्यांचाही विस्तार होऊ शकेल. सध्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन उद्योगाची वार्षिक उलाढाल ८.५ लाख कोटींची, तर मोबाइल उद्योग क्षेत्रात ८ लाख कोटींची उलाढाल होत आहे, अशी माहिती वैष्णव यांनी दिली. याशिवाय, कृत्रिम प्रज्ञा (एआय), क्वान्टम टेक्नॉलॉजी, सेमीकंडक्टर, अवकाश तंत्रज्ञान आदी नवविकसित तंत्रज्ञान क्षेत्रांत भारत अमेरिकेच्या मदतीने ३५ संयुक्त संशोधन प्रकल्प हाती घेणार आहे. देशी बनावटीच्या ४ जी, ५ जी विकसित तंत्रज्ञानानंतर याच क्षेत्रातील ओपन रेडिओ ॲक्सेस नेटवर्क (ओपन रॅन) संयुक्तपणे विकसित केले जाईल. तसेच, जेट इंजिन उत्पादन भारतात होणार असल्याचे वैष्णव यांनी सांगितले. अमेरिकेच्या मदतीने ३५ संयुक्त संशोधन प्रकल्प भारतात हाती घेतले जाणार आहेत.
हेही वाचाः संकटातून बाहेर पडण्यासाठी ‘बायजू’ची आता धावाधाव; गुंतवणूकदारांनाही दिले ‘हे’ आश्वासन
काश्मीर-पाक नव्हे, तंत्रज्ञान विकासाला प्राधान्य!
पूर्वी अमेरिका व भारत द्वीपक्षीय चर्चांमध्ये काश्मीर प्रश्न, पाकिस्तानवर भर दिला जात असे. त्यावेळी भारत विकसित देशांच्या तंत्रज्ञानावर अवलंबून होता. पंतप्रधान मोदींच्या अमेरिका भेटीत चर्चा दोन्ही देश संयुक्तरित्या तंत्रज्ञान विकसित कसे करू शकतील या मुद्द्याभोवती झाली. हा अमेरिका व भारत संबंधांतील आमूलाग्र बदल म्हणता येईल, असे वैष्णव म्हणाले.