पीटीआय, नवी दिल्ली
वाहनांची ग्राहकांकडून मागणी कमी होत असताना फेब्रुवारीमध्ये वाहन निर्मात्यांकडून वितरकांना पाठवल्या जाणाऱ्या प्रवासी वाहनांच्या विक्रीत १.९ टक्क्यांनी वाढ होऊन, ती ३.७७ लाखांवर पोहोचली, अशी माहिती वाहन निर्मात्यांची नेतृत्वदायी संघटना ‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चर्स (सियाम)’ने दिली.
फेब्रुवारी २०२४ मध्ये एकूण प्रवासी वाहनांची घाऊक विक्री ३.७० लाख होती. तर फेब्रुवारी २०२५ मध्ये ३.७८ लाख वाहनांची विक्री नोंदवली गेलू, फेब्रुवारी २०२४ च्या तुलनेत त्यात १.९ टक्के अधिक राहिली, असे सियामचे महासंचालक राजेश मेनन यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. गेल्या महिन्यात एकूण दुचाकी वाहनांच्या विक्रीत ९ टक्क्यांनी घट होऊन ती १३.८४ लाखांवर मर्यादित राहिली. फेब्रुवारीमध्ये स्कूटरची विक्री किरकोळ घटून ५.१२ लाखांवर मर्यादित राहिली. जी मागील वर्षीच्या याच कालावधीत ५.१५ लाख अशी होती.
गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये ९.६४ लाख मोटारसायकलींच्या विक्रीही यंदा १३ टक्क्यांनी घटून ८.३८ लाखांवर मर्यादित राहिली. गेल्या महिन्यात वितरकांना एकूण तीनचाकी वाहनांची रवानगी ही गेल्या वर्षीच्या याच कालावधीत ५५,१७५ हजारांच्या तुलनेत ५ टक्क्यांनी वाढून ५७,७८८ वर पोहोचली.
मार्चमध्ये होळी आणि इतर सणांमुळे मागणी वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे, असे मेनन यांनी सांगितले.