पीटीआय, नवी दिल्ली : बाजारात सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकांमध्ये नवनवीन उच्चांक स्थापित करणारी तेजीच्या पार्श्वभूमीवर, समभाग-संलग्न अर्थात इक्विटी म्युच्युअल फंडांकडे गुंतवणूकदारांचा ओढा वाढतोय. समभाग-संलग्न प्रकारात, स्मॉलकॅप फंडांना मागणी कायम राहिली असून, नोव्हेंबरअखेर स्मॉलकॅप म्युच्युअल फंड व्यवस्थापनाखालील मालमत्तेने दोन लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात ६९ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.
म्युच्युअल फंड उद्योगाची शिखर संघटना ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया (ॲम्फी)’ने दिलेल्या माहितीनुसार, मासिक आधारावर स्मॉल कॅप फंडातील मालमत्तेत १० टक्क्यांची भर पडते आहे. २०१९-२० च्या चौथ्या तिमाहीपासून, बाजारातील अनुकूल हालचालींमुळे या श्रेणीमधील गंगाजळीत अभूतपूर्व वाढ झाली आहे. विद्यमान वर्षात (नोव्हेंबरपर्यंत) स्मॉल-कॅप फंडांनी ३७,१७८ कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित केली. यामध्ये गेल्या महिन्यात ३,६९९ कोटी रुपये आणि ऑक्टोबरमध्ये ४,४९५ कोटी रुपयांचा विक्रमी निधी जमा झाला आहे. दुसरीकडे, लार्ज-कॅप फंडातून गुंतवणूकदारांनी पहिल्या ११ महिन्यांत २,६८८ कोटी रुपये काढले.
हेही वाचा… ‘ईपीएफओ’ची ईटीएफमध्ये २७ हजार कोटींची गुंतवणूक
फोलिओ खात्यांच्या संख्येत दुप्पट वाढ
स्मॉल कॅप या श्रेणीतील गुंतवणूकदारांच्या खात्यांमध्येही नोव्हेंबरपर्यंत तब्बल ६२ लाख फोलिओ खात्यांची भर पडून ते १.६ कोटींवर पोहोचले आहेत, जे वर्षभरापूर्वी ९७.५२ लाख होते. यावरून गुंतवणूकदारांचा स्मॉल कॅप फंडांकडे वाढलेला कल दिसून येतो. सेबीच्या नियमानुसार, स्मॉल-कॅप म्युच्युअल फंडाअंतर्गत, फंड व्यवस्थापकांना त्यांच्या पोर्टफोलिओपैकी किमान ६५ टक्के गुंतवणूक स्मॉल-कॅप कंपन्यांच्या समभागांमध्ये करणे आवश्यक आहे.