पीटीआय, नवी दिल्ली
सणोत्सवाच्या काळातील जोरदार मागणीमुळे वाहनांची विक्री या कालावधीत ट्रॅक्टर वगळता सर्व विभागांसह विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचली, अशी माहिती फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन अर्थात ‘फाडा’ने मंगळवारी दिली.
सरलेल्या ४२ दिवसांच्या उत्सवी कालावधीत एकूण वाहनांची विक्री १९ टक्क्यांनी वाढून ३७.९३ लाख वाहनांवर पोहोचली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत ३१.९५ लाख वाहनांची विक्री झाली होती. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून सुरू होणाऱ्या दसरा, धनत्रयोदशीच्या मुहर्तासह, १५ दिवसांनी संपणाऱ्या दीपोत्सवाच्या कालावधीत प्रवासी वाहनांची किरकोळ विक्री ५.४७ लाखांवर गेली आहे, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीत ४.९६ लाख वाहने होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात १० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली.
नवरात्रीच्या काळात, विशेषत: प्रवासी वाहनांच्या विक्रीचा जोर कमी राहिला. मात्र दिवाळीपर्यंत परिस्थितीत सुधारणा होत एकंदर प्रवासी वाहन विक्रीने १० टक्के वाढीचा टप्पा गाठला. यंदा सणासुदीच्या काळात स्पोर्ट्स युटिलिटी वाहनांना सर्वाधिक मागणी होती, अशी माहिती ‘फाडा’चे अध्यक्ष मनीष राज सिंघानिया यांनी दिली.
ट्रॅक्टरच्या विक्रीत मात्र घसरण
ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असलेल्या ट्रॅक्टरची विक्री मात्र यंदा किरकोळ घसरून ८६,५७२ वर मर्यादित राहिली. गेल्या वर्षीच्या सणासुदीच्या काळात ही विक्री ८६,९५१ नोंदण्यात आली होती. या वर्षी सणासुदीचा कालावधी १५ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर असा राहिला होता. गेल्या वर्षी मात्र तो २६ सप्टेंबर ते ६ नोव्हेंबरदरम्यान विस्तारलेला होता.
दुचाकींच्या नोंदणीत वाढ
दुचाकींची नोंदणी वर्षभरात २१ टक्क्यांनी वाढून २३.९६ लाख दुचाकींवरून ती यावर्षी २८.९३ लाखांवर पोहोचली आहे. विशेषतः ग्रामीण भागाने दुचाकी खरेदीमध्ये वाढ होण्यास हातभार लावला आहे. दरम्यान, या कालावधीत वाणिज्य वाहनांची विक्री वार्षिक आठ टक्क्यांनी वाढून १.२३ लाख वाहनांवर पोहोचली. तीनचाकी वाहनांच्या नोंदणीत ४१ टक्क्यांनी वाढ होऊन ती १.४२ लाख वाहने राहिली. जी मागील वर्षीच्या याच कालावधीत १.०१ लाख होती.