Veg Thali Inflation: पावसाच्या लहरीपणामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात झालेली घट आणि सणासुदीच्या काळात मागणी वाढल्यामुळे नोव्हेंबर २०२३ मध्ये शाकाहारी अन्न पदार्थ खाणाऱ्यांची थाळी महागली आहे. महागडा कांदा आणि टोमॅटोमुळे ऑक्टोबर २०२३ च्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यात शाकाहारी जेवणाच्या किमतीत ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. रेटिंग एजन्सी क्रिसिलने ही आकडेवारी जाहीर केली आहे.
महागडा कांदा आणि टोमॅटो हे ठरले कारणीभूत
नोव्हेंबर महिन्यात कांद्याच्या दरात ५० टक्के तर टोमॅटोच्या दरात ३५ टक्के वाढ झाली आहे. क्रिसिलने आपल्या रोटी राइस रेट इंडेक्समध्ये म्हटले आहे की, या दोन खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्यामुळे व्हेज थाळीच्या किमतीत वाढ झाली आहे. यापूर्वी ऑगस्ट २०२३ मध्ये व्हेज थाळीच्या किमतीत २४ टक्क्यांनी वाढ झाली होती.
हेही वाचाः ऑनलाइन गेमिंग कंपन्यांवर ११२ हजार कोटींची थकबाकी; आतापर्यंत ७१ हून अधिक GST नोटिसा पाठवल्या
नोव्हेंबर २०२२ च्या तुलनेत व्हेज थाळी ९ टक्क्यांनी महागली
जून २०२३ पासून देशात टोमॅटोच्या किमतीत मोठी वाढ झाली होती, जेव्हा टोमॅटो किरकोळ बाजारात ३०० रुपये प्रति किलो दराने उपलब्ध होते. सप्टेंबरपासून भाव मंदावले आणि ऑक्टोबरपासून कांद्याचे भाव वाढू लागले. यामुळे नोव्हेंबर २०२३ मध्ये शाकाहारी जेवणाच्या थाळीची किंमत गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर २०२२ च्या तुलनेत ९ टक्क्यांनी महाग झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यात कांद्याच्या दरात ९३ टक्के तर टोमॅटोच्या दरात १५ टक्के वाढ झाली आहे. डाळींचे भाव वाढल्याने व्हेज थाळीही महाग झाली आहे. नोव्हेंबर २०२२ च्या तुलनेत यावर्षी नोव्हेंबरमध्ये डाळींच्या किमतीत २१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
हेही वाचाः गावागावांमध्ये आता रोजगार वाढणार, मोदी सरकारकडून मनरेगा अंतर्गत १०,००० कोटींचा अतिरिक्त निधी जारी
नॉनव्हेज खाणाऱ्यांना दिलासा
मात्र, नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी नोव्हेंबर महिना चांगला गेला आहे. चिकनचे दर घसरल्याने नॉनव्हेज थाळी स्वस्त झाली आहे. मांसाहारी थाळीमध्ये ५० टक्के चिकनचा समावेश होतो. नॉनव्हेज थाळीमध्ये व्हेज थाळी सारख्याच गोष्टी असतात. मांसाहारी थाळीमध्ये फक्त डाळऐवजी चिकनचा समावेश केला जातो.