पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने परमिंदर चोप्रा यांची अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (CMD) म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीची १४ ऑगस्ट २०२३ पासून अंमलबजावणी करण्यात आली आहे. चोप्रा या देशातील सर्वात मोठ्या नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांच्या (NBFCs) प्रमुख असलेल्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.
परमिंदर चोप्रा यापूर्वी जूनपासून सीएमडीचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत होत्या. तसेच संचालक (वित्त) म्हणूनही काम करीत होत्या. संचालक (वित्त) म्हणून त्यांच्या कार्यकाळात वित्त विभागाने आतापर्यंतचा सर्वोच्च निव्वळ नफा, सर्वोच्च निव्वळ संपत्ती आणि सर्वात कमी NPA पातळी गाठली आहे. यामुळे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनला ‘महारत्न’चा सर्वोच्च दर्जा मिळाला आहे.
हेही वाचाः टीसीएसने तेजस नेटवर्कला ‘इतक्या’ कोटी रुपयांची दिली ऑर्डर; कंपनी BSNL ला 4G/5G उपकरणे पुरवणार
आत्मानिर्भर भारतचा भाग म्हणून सुरू करण्यात आलेल्या ऊर्जा वितरण क्षेत्रासाठी १.१२ लाख कोटी रुपयांच्या तरलता गुंतवणूक योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीतही त्यांचा मोलाचा वाटा होता.
हेही वाचाः IT क्षेत्रात बेरोजगारीची लाट! ७ महिन्यांत २.२६ लाख कर्मचाऱ्यांनी गमावल्या नोकऱ्या
परमिंदर चोप्रा यांना ऊर्जा आणि आर्थिक क्षेत्रातील ३५ वर्षांचा अनुभव आहे. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनमध्ये चोप्रा यांनी बँकिंग, ट्रेझरी, मालमत्ता दायित्व व्यवस्थापन आणि तणावग्रस्त मालमत्ता निराकरण यांसारख्या प्रमुख आर्थिक कार्यांचे नेतृत्व केले आहे. त्यांनी यापूर्वी एनएचपीसी लिमिटेड आणि पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांसारख्या ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांमध्ये काम केले आहे.