नागपूर : राज्य वीज नियामक आयोगाकडून मंजूर मेरिट ऑर्डर डिस्पॅचनुसार (एमओडी) सध्या अदानी पॉवर या खासगी कंपनीची वीज महानिर्मितीच्या अनेक संचातून निर्मित विजेहून महागली आहे. राज्यात बऱ्याचदा अचानक विजेची मागणी वाढल्यास महावितरणला अखंडित वीजपुरवठ्यासाठी अल्पकालीन निविदेतून ७.७८ रुपये प्रति युनिट दराने महागडी वीज घ्यावी लागत आहे.
राज्यात विजेची मागणी वाढून २७ ते २८ हजार मेगावाॅटच्या जवळपास पोहोचली आहे. त्यात अधूनमधून अचानक वाढही होते. या स्थितीत राज्यातील ग्राहकांना अखंडित वीजपुरवठ्यासाठी महावितरणला बऱ्याचदा अल्पकालीन निविदेच्या माध्यमातून खुल्या बाजारातून महागडी वीज खरेदी करावी लागते. १२ मे २०२४ रोजी महावितरणला अल्पकालीन निविदेतून ७.७८ रुपये प्रतियुनिट तर पाॅवर एक्सचेंजमधून २.४६ रुपये प्रति युनिट दराने वीज खरेदी करावी लागली. महावितरणला राज्य वीज नियामक आयोगाच्या नियमानुसार सर्वात स्वस्त वीजनिर्मित होणाऱ्या संचातून प्राधान्याने वीज खरेदी करावी लागते. सर्व कंपन्यांचे विजेचे दर राज्य वीज नियामक आयोग मंजूर करते.
हेही वाचा >>> Gold-Silver Price: सततच्या वाढीनंतर सोन्याचे भाव पडले, १० ग्रॅमची किंमत पाहून बाजारात गर्दी
महानिर्मितीच्या खापरखेडा संच क्रमांक ५ मधील विजेचे दर प्रति युनिट ३.१४ रुपये, कोराडी संच क्र. ८ ते १० मधील विजेचे दर ३.२३ रुपये, खापरखेडातील १ ते ४ क्र.च्या संचाचे दर ३.५६ रुपये, चंद्रपूरमधील संच क्रमांक ८ आणि ९ चे दर ३.६० रुपये, कोराडी संच क्रमांक ६ चे दर ३.६३ रुपये प्रति युनिट आहे. तर परळीच्या संच क्रमांक ३ आणि ४ चे दर ३.७७ रुपये, येथील संच क्रमांक ८ चे दर ५.२९ रुपये, संच क्रमांक ६ आणि ७ चे दर ५.२६ रुपये, भुसावळच्या युनिट क्रमांक ३ चे दर ४.९३ रुपये, नाशिकच्या संच क्रमांक ३ ते ५ चे दर ४.७८ रुपये प्रति युनिट आहे. या उलट अदानीच्या राज्यातील विविध प्रकल्पातील संचातील विजेचे दर ४.२४ रुपये ते ४.३९ रुपये प्रति युनिट या दरम्यान आहेत.
धुळे येथील जिंदल पाॅवर लिमिटेडचे संच क्रमांक १ आणि २ चे दर ८.४९ रुपये प्रति युनिट, रतन पाॅवर लिमिटेड अमरावतीचे दर २.८८ रुपये प्रति युनिट आहे. तर अन्य कंपन्यांच्या विजेचे दर वेगवेगळे आहेत. या आकडेवारीला महानिर्मिती आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नाव न टाकण्याच्या अटीवर दुजोरा दिला.