Donald Trump 90 Days Pause on Tariff : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या व्यापार युद्धाचे परिणाम सध्या जगभरात पाहायला मिळते आहेत. जगभरातील ७० देशांमध्ये सरसकट परस्पर आयातशुल्क लादून जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये अनिश्चितता निर्माण केल्यानंतर दोन दिवसांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी आपल्या निर्णयावरून माघार घेतली आहे. बहुसंख्य देशांवरील शुल्काला ९० दिवसांची स्थगिती देत असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्याचवेळी चीनवरील आयातशुल्क १२५ टक्क्यांपर्यंत वाढवून व्यापारयुद्ध अधिक तीव्र करत असल्याचे संकेत दिले आहेत.
व्यापार कराला ९० दिवसांची स्थगिती दिल्यानंतर शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात तेजी पाहायला मिळाली. ज्यामुळे बुधवारी जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या एकत्रित संपत्तीमध्ये ३०४ अब्ज डॉलर्सची भर पडली आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकाच्या (Bloomberg Billionaires Index) इतिहासातील एका दिवसांत नोंदवलेली ही सर्वात मोठी वाढ आहे.
व्यापार कराला ९० दिवसांची स्थगिती देण्यात आल्यानंतर बुधवारी एसअँडपी ५०० हा ५,४५६.९० (९.५२ टक्के) वाढला, ही वाढ २००८ पासून एका दिवसात झालेली सर्वाधिक वाढ आहे. डाऊ जोन्स इंडस्ट्रीयल एव्हरेज अडवान्स हा २,९६२.८६ अंकांनी किंवा ७.८७ टक्के वाढला आणि Nasdaq कंपोझीट हा १२.१६ टक्के वाढला.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या टॅरिफ घोषणेनंतर गेल्या आठवड्यात झालेल्या बाजारातील पडझडीनंतर हा दिवस विक्रमी ठरली. बुधवारी हा काही जणांसाठी कमाईचा दिवस ठरला. एकूण संपत्ती वाढीने मार्च २०२२ मध्ये स्थापित केलेल्या २३३ अब्ज डॉलर्सचा विक्रम मोडला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी ९० दिवसांच्या स्थगितीची घोषणा केल्यानंत सर्वात जास्त फायदा झाला तो इलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीला. तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज समजल्या जाणाऱ्या या कंपनीने ३६ अब्ज डॉलर्सची कमाही केली. इलेक्ट्रिक कार बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स या घोषणेनंतर २३ टक्क्यांनी वधारले असे ब्लूमबर्गने म्हटले आहे. तर मार्ग झुकरबर्ग यांनी जवळपास २६ अब्ज डॉलर्स कमावले.
त्यानंतर एनव्हीडिया कॉर्पचे जेन्सेन हुआंग यांचा क्रमांक येतो. चिप बनवणाऱ्या या कंपनीच्या शेअर्सनी १९ टक्क्यांनी उसळी घेतल्यानंतर त्यांची संपत्ती १५.५ अब्ज डॉलर्सने वाढली.
असे असले तरी टक्केवारीच्या दृष्टीने विचार करायचा झाल्यास कारवान को. चे सीईओ इर्नेस्ट ग्राशिया ३ हे सर्वात पुढे राहिले. कारण त्यांच्या संपत्तीत २५ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली.
अॅप्पलच्या शेअर्समध्ये १५ टक्क्यांपेक्षा जास्त तर वॉलमार्टच्या शेअर्समध्ये ९.६ टक्के वाढ झाली. ट्रम्प यांनी आयातशुल्क स्थगितीची घोषणा केली तेव्हा, दुपारी १:१८ ईटी डाऊ सुमारे ३५० अंकांनी जास्त होता. मात्र काही क्षणात ३०-स्टॉक निर्देशांक २००० पेक्षा जास्त अंकांनी वाढला.