Elon Musk Sold X To XAI: सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेले अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क पुन्हा एकदा चर्चेत आहेत. पण यावेळी मस्क यांचे चर्चेत येण्याचे कारण वेगळेच आहे. कारण, त्यांनी त्यांची एक कंपनी स्वतःच्या दुसऱ्या कंपनीला विकली आहे.
एलॉन मस्क यांनी शुक्रवारी घोषणा केली की, त्यांनी सोशल मीडिया साइट X त्यांच्या स्वतःच्या xAI आर्टिफिशियल इंटेलिजेंस कंपनीला 33 अब्ज अमेरिकन डॉलर्सला विकली आहे. टेस्ला आणि स्पेसएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या मस्क यांनी २०२२ मध्ये ४४ अब्ज डॉलर्समध्ये ट्विटर ही सोशल मीडिया साइट विकत घेतली होती. त्यानंतर त्यांनी ट्विटरचे नाव बदलून एक्स असे केले होते.
आमच्यासाठी मोठी संधी
दरम्यान याबाबत एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये एलॉन मस्क म्हणाले की, “हे पाऊल उचलल्यामुळे एक्सचे युजर्सचे मोठे जाळे आणि एक्स एआयच्या प्रगत क्षमता व कौशल्याच्या जोरावर आमच्यासाठी मोठ्या संधी निर्माण करणार आहे. या करारमुळे एक्स एआयचे ८० अब्ज अमेरिकन डॉलर्स आणि एक्सचे ३३ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतके मूल्य झाले आहे. या दोन्ही कंपन्या खाजगी मालकीच्या असल्यामुळे त्यांचे आर्थिक विवरणपत्र सार्वजनिक करण्याची आवश्यकता नाही.”
ट्विटरच्या नामांतरासह अनेक निर्णय
एलॉन मस्क हे टेस्ला आणि स्पेसएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. याचबरोबर अमेरिकेत सत्तांतर झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी मस्कना त्यांच्या सरकारचे सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे. दरम्यान मस्क यांनी २०२२ मध्ये ट्विटर ही सोशल मीडिया साइट ४४ अब्ज डॉलर्समध्ये विकत घेतली. तेव्हा त्यांनी ट्विटरच्या नामांतरासह अनेक वादग्रस्त निर्णय घेतले होते.
काय आहे xAI?
xAI ही एक अमेरिकन कंपनी आहे. जी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात काम करते. मार्च २०२३ मध्ये एलोन मस्क यांनी स्थापन केलेल्या या कंपनीचे ध्येय “विश्वाचे खरे स्वरूप समजून घेणे” आहे. कॅलिफोर्नियातील सॅन फ्रान्सिस्को बे एरिया येथे मुख्यालय असलेल्या xAI च्या स्थापनेमुळे ओपनएआय नंतर एआय क्षेत्रात एलोन मस्कचा पुन्हा प्रवेश झाला आहे.
नोव्हेंबर २०२३ मध्ये, एलॉन मस्क यांनी xAI चा पहिला प्रकल्प Grok ची घोषणा केली होती. नंतर त्यांनी त्याचा एक्सवर समावेश केला होता. त्यांनी एक्सवर गॉर्क फिचर काही महिन्यांसाठी सर्वांसाठी मोफत केले होते. अलिकडच्या काळात, भारतासारख्या देशांमध्ये गॉर्कची लोकप्रियता वाढली आहे.