मुंबई : औषध निर्माण क्षेत्रातील पुणेस्थित एमक्यूआर फार्मास्युटिकल्सची प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) येत्या ३ जुलैपासून सुरू होणार असून ५ जुलैपर्यंत गुंतवणूकदारांना आयपीओसाठी अर्ज करता येईल. कंपनीने या भागविक्रीसाठी ९६० ते १००८ रुपयांचा किंमतपट्टा निश्चित केला आहे. गुंतवणूकदारांना किमान १४ समभाग आणि १४ समभागांच्या पटीत समभागांसाठी अर्ज करावा लागेल.

आयपीओच्या माध्यमातून कंपनीचा १,९५२ कोटी रुपयांचा निधी उभारणीचा मानस आहे. १,१५२ कोटी रुपये मूल्याच्या नवीन समभागांची विक्री करण्यात येईल. तर विद्यमान प्रवर्तकांच्या मालकीच्या आंशिक समभाग विक्रीच्या (ओएफएस) माध्यमातून ८०० कोटी रुपये उभारण्यात येणार आहेत. प्रवर्तक आणि भागधारकांमध्ये समभागांची विक्री करणाऱ्यांमध्ये प्रवर्तक सतीश मेहता आणि अमेरिकेतील बेन कॅपिटलसशी संलग्न गुंतवणूकदार कंपनी बीसी इन्व्हेस्टमेंट समभाग विक्री करणार आहे. सध्या, सतीश मेहता यांच्याकडे कंपनीत ४१.८५ टक्के आणि बीसी इन्व्हेस्टमेंटकडे १३.०४ टक्के हिस्सेदारी आहे.

हेही वाचा >>> टाटा स्टीलचा ब्रिटनमधील प्रकल्प अडचणीत; कंपनीचे कामगार संघटनेसह संपाविरोधात कायदेशीर कारवाईचे पाऊल

समभाग विक्रीतून उभारण्यात येणाऱ्या एकूण निधीपैकी १,१५२ कोटी रुपये कर्जाची परतफेड आणि भविष्यातील भांडवली गरजा पूर्ण करण्यासाठी वापरला जाणार आहे. समभाग भांडवली बाजारात सूचिबद्ध झाल्यानंतर कंपनीचे बाजार भांडवल १९,००० कोटी रुपयांपुढे जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

आयपीओमधील ५० टक्के समभाग पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी, ३५ टक्के किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आणि उर्वरित १५ टक्के समभाग बिगरसंस्थागत गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. तर आयपीओमध्ये कर्मचाऱ्यांसाठी सुमारे १ लाख समभाग राखीव ठेवण्यात आले आहेत.

पुण्यातील एमक्यूआर फार्मा ही उपचारात्मक क्षेत्रांमधील उत्पादनांचा विकास, निर्मिती आणि जागतिक स्तरावर विपणन करण्यात गुंतलेली आहे.

बन्सल वायरची ७४५ कोटी रुपयांची भागविक्री ३ जुलैपासून

स्टील वायर उत्पादक बन्सल वायरने प्रारंभिक समभाग विक्रीसाठी २४३ ते २५६ रुपयांचा किंमतपट्टा निश्चित केला आहे. ही भागविक्री ३ ते ५ जुलैदरम्यान पार पडणार आहे. येत्या २ जुलै रोजी सुकाणू गुंतवणूकदारांना आयपीओसाठी बोली लावता येईल. कंपनीचा या आयपीओच्या माध्यमातून ७४५ कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा मानस असून यासाठी संपूर्ण नवीन समभागांची विक्री करण्यात येणार आहे. गुंतवणूकदारांना किमान ५८ समभाग आणि ५८ समभागांच्या पटीत समभागांसाठी अर्ज करावा लागेल. बन्सल वायर इंडस्ट्रीज स्टील वायर्सचे उत्पादन आणि निर्यात करण्याच्या व्यवसायात गुंतलेली आहे.