वृत्तसंस्था, सॅनफ्रान्सिस्को
जगभरातील बड्या कंपन्यांकडून कर्मचारी कपातीचे सत्र कायम आहे. जागतिक पातळीवर मंदीचे सावट असून, अनेक कंपन्या खर्चात कपात करीत आहेत. त्यासाठी प्रामुख्याने मनुष्यबळ कमी करण्याचे पाऊल उचलले जात आहे. आता आणखी तीन कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे.
गॅपकडून कपातीची दुसरी फेरी
वस्त्रप्रावरणे क्षेत्रातील बडी कंपनी गॅप इन्कॉर्पोरेशनने १ हजार ८०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली आहे. कंपनीची मनुष्यबळ कपातीची ही दुसरी फेरी आहे. वाढत्या महागाईमुळे ग्राहकांची क्रयशक्ती कमी झाली असून, त्याचा फटका अनेक अमेरिकी कंपन्यांना बसत आहे. त्यात गॅपचाही समावेश आहे. याआधी गॅपने ५०० कर्मचाऱ्यांना कमी केले होते. कंपनीच्या नफ्यात घसरण होत असून, विक्रीतही घट होत आहे.
लिफ्टकडून २६ टक्के कर्मचाऱ्यांना नारळ
उबरची प्रतिस्पर्धी कंपनी असलेल्या लिफ्टने १ हजार ७२ कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा केली आहे. एकूण मनुष्यबळापैकी २६ टक्के कर्मचाऱ्यांना घरी पाठवले जाणार आहे. खर्चात कपात करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे. कंपनीचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिशर यांनी याबाबत आधीच संकेत दिले होते.
ॲमेझॉनकडून पुन्हा मनुष्यबळ कमी
ॲमेझॉनने याआधी २७ हजार कर्मचाऱ्यांच्या दोन टप्प्यांत कपात केली आहे. आता कंपनीने आणखी कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे. ॲमेझॉन स्टुडिओ आणि प्राइम व्हिडीओ विभागातील कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार आहे. सुमारे १०० कर्मचाऱ्यांना घरी पाठवले जाणार आहे. या विभागात सुमारे ७ हजार कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. बड्या तंत्रज्ञान आणि मनोरंजन कंपन्यांकडून मनुष्यबळ कपातीचे सत्र सुरू असल्याने ॲमेझॉनने हे पाऊल उचलल्याची माहिती सूत्रांनी दिली.