Employees Provident Fund Organisation : भारतात बहुतांश नोकरदार लोकांचे स्वत:चे पीएफ खाते आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेद्वारे चालविले जाणारे हे पीएफ खाते म्हणजेच ईपीएफओ ही भविष्यासाठी चांगली बचत योजना आहे. त्यामध्ये कर्मचारी आणि मालक दोघेही योगदान देतात. दरमहा तुमच्या पगाराच्या १२ टक्के रक्कम पीएफ खात्यात जमा होते. पीएफ खात्यावरही सरकारकडून चांगले व्याज दिले जाते. पीएफ खात्याची सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे पीएफ खातेधारक गरज पडल्यास कधीही त्याच्या पीएफ खात्यातून पैसे काढू शकतो.
लग्न किंवा घरात कोणतीही मेडिकल इर्मजन्सी आली तरीही पैसे काढता येतात. अनेकदा लोकांच्या मनात हा प्रश्न येतो की, पीएफ खातेधारकाचा मृत्यू झाला, तर त्या पैशाचे काय होणार? मृत्यूनंतर पैसे कोणाला मिळतात आणि पैसे काढण्याची प्रक्रिया काय आहे? याच प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊ…
नॉमिनीला मिळतो हक्क
जर एखाद्या पीएफ खातेदाराचा अचानक मृत्यू झाला, तर अशा वेळी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) नियमांनुसार खात्याची संपूर्ण रक्कम नॉमिनीला दिली जाते. साधारणपणे नॉमिनी पीएफ खात्यामध्ये आधीच नोंदणीकृत असतो. त्यानंतर नॉमिनीला पीएफ खातेधारकाच्या खात्यातील रकमेसाठी डेथ क्लेम करावा लागतो. त्यासाठी पोस्ट ऑफिस किंवा ईपीएफओच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध डेथ क्लेम फॉर्म भरून, पीएफ खात्यातील रकमेसाठी अर्ज केला जातो.
फॉर्म 20 भरून करावा लागतो सबमिट
पीएफ खातेधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या नॉमिनीला खातेधारकाच्या संपूर्ण माहितीसह फॉर्म 20 भरून, तो सबमिट करावा लागेल. ज्या कंपनीमध्ये खातेदार शेवटच्या वेळेपर्यंत काम करीत होता, त्या कंपनीकडून हा फॉर्म फॉरवर्ड केला जातो. सर्व कागदपत्रांसह फॉर्म भरल्यानंतर तो सबमिट केला जातो. नॉमिनीला त्याचा नोंदणीकृत फोन नंबरवर सर्व माहिती दिली जाते. क्लेम सेटल झाल्यानंतर पैसे दिलेल्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातात.
ही कागदपत्रे आवश्यक
पीएफ डेथ क्लेमसाठी नॉमिनीला पीएफ खाते क्रमांक, नॉमिनीची इतर माहिती, नाव, पत्ता, ओळखपत्र व मोबाइल नंबर यासह काही महत्त्वाच्या कागदपत्रांसह डेथ क्लेम फॉर्म, पीएफ अकाउंट होल्डर डेथ सर्टिफिकेट आणि खातेधारकाचे पासबुक आवश्यक आहे. कृपया लक्षात घ्या की, पीएफ खातेधारकाकडे नॉमिनी नसल्यास, ती रक्कम कायदेशीर वारसाकडे जाते.