पीटीआय, नवी दिल्ली
निवृत्ती वेतनाचे नियोजन करणाऱ्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ‘पीएफ’च्या पैशाची एक्सचेंज ट्रेडेड फंड अर्थात ‘ईटीएफ’मध्ये विद्यमान आर्थिक वर्षात ऑक्टोबरपर्यंत २७,१०५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली, अशी माहिती सोमवारी संसदेत देण्यात आली. ‘ईपीएफओ’ने २०२२-२३ या आर्थिक वर्षात ‘ईटीएफ’मध्ये ५३,०८१ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती, जी २०२१-२२ मधील ४३,५६८ कोटी रुपयांपेक्षा अधिक होती, असे केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेत सांगितले.
‘ईपीएफओ’ने चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ऑक्टोबरपर्यंत ‘ईटीएफ’मध्ये आतापर्यंत २७,१०५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ‘ईपीएफओ’कडून दरवर्षी भांडवली बाजारामधील गुंतवणूक ओघात वाढ होत आहे. वर्ष २०१६-१७ मध्ये १४,९८३ कोटी रुपये, २०१७-१८ मध्ये २४,७९० कोटी रुपये, २०१८-१९ मध्ये २७,९७४ कोटी रुपये, वर्ष २०१९-२० मध्ये ३१,५०१ कोटी रुपये आणि २०२०-२१ मध्ये ३२,०७१ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. संघटना कोणत्याही कंपनीच्या समभागांमध्ये थेट गुंतवणूक करत नसून ईटीएफच्या माध्यमातून भांडवली बाजारात गुंतवणूक करते, असेही तेली यांनी स्पष्ट केले.
‘ईपीएफओ’कडील गंगाजळी १८.३० लाख कोटींपुढे
३१ मार्च २०२२ अखेर ‘ईपीएफओ’द्वारे व्यवस्थापित केलेल्या विविध फंडांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता १८.३० लाख कोटी रुपये होता, त्यापैकी केवळ ८.७० टक्के निधी ईटीएफमध्ये गुंतवला आहे. तर उर्वरित ९१.३० टक्के निधी रोखेसंलग्न गुंतवणूक साधनांमध्ये गुंतवला आहे. ‘ईपीएफओ’ने ऑगस्ट २०१५ पासून ‘ईटीएफ’मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती.