नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओची गुंतवणुकीतील एकूण रक्कम गेल्या पाच वर्षांत दुप्पट होऊन २०२३-२४ या आर्थिक वर्षात २४.७५ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे, ती वर्ष २०१९-२० मध्ये ११.१ लाख कोटी रुपये होती.
‘ईपीएफओ’ने अधिसूचित केलेल्या गुंतवणुकीच्या पद्धतीनुसार निधीची गुंतवणूक करण्यात आली आहे. ही गुंतवणूक रोखे आणि एक्सचेंज-ट्रेडेड फंडांमध्ये (ईटीएफ) करण्यात आली आहे. ३१ मार्च २०१५ रोजी झालेल्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या २०७ व्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, ऑगस्ट २०१५ पासून एक्सचेंज-ट्रेडेड फंडांमध्ये गुंतवणूक सुरू करण्यात आली. ती गुंतवणूक ३१ मार्च २०२४ अखेर २४.७५ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे, अशी माहिती केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी लोकसभेत दिली.
हेही वाचा >>> ‘निष्क्रिय बँक खात्यां’सदर्भात नियम शिथिलतेचे स्टेट बँकेची मागणी
ईपीएफओ नियमितपणे एक्सचेंज ट्रेडेड फंडाद्वारे भांडवली बाजारात गुंतवणूक करते. याव्यतिरिक्त, केंद्र सरकारच्या मालकीच्या कंपन्यांमध्ये निर्गुंतवणुकीसाठी तयार केलेल्या ईटीएफमध्ये वेळोवेळी गुंतवणूक ईपीएफओने केली आहे. विद्यमान आर्थिक वर्षात, ऑक्टोबर २०२४ पर्यंत ईटीएफमध्ये ३४,२०७.९३ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ईपीएफओच्या सुमारे ७ कोटी सदस्यांना भांडवली बाजारातून मिळणाऱ्या भरीव परताव्याचा लाभ देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला होता. केंद्र सरकारद्वारे व्यवस्थापित केलेल्या जाणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट्स (इन्व्हिट्स) आणि रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट्स (रिट्स) मध्ये देखील गुंतवणूक करण्यास मान्यता दिली आहे.