पीटीआय, नवी दिल्ली
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ‘ईपीएफओ’ने सर्व प्रादेशिक कार्यालयांमध्ये केंद्रीकृत निवृत्ती वेतन प्रणाली (सीपीपीएस) लागू केली आहे. नव्या प्रणालीचा देशभरातील ६८ लाखांहून अधिक निवृत्तीवेतनधारकांना फायदा होईल, असे केंद्रीय कामगारमंत्री मनसुख मांडविया यांनी शुक्रवारी दावा केला. ‘सीपीपीएस’च्या माध्यमातून सध्याच्या निवृत्तिवेतन (पेन्शन) वितरणाच्या व्यवस्थेत मोठा बदल होणार आहे. ईपीएफओच्या प्रत्येक विभागीय/प्रादेशिक कार्यालयाकडून ३-४ बँकांशी स्वतंत्रपणे करार केला जात होता. त्या बँकांमधून निवृत्तिवेतन वितरण केले जात होते. आता नवीन केंद्रीकृत निवृत्तिवेतन प्रणालीअंतर्गत लाभार्थी कोणत्याही बँकेतून निवृत्तिवेतन प्राप्त करू शकेल. शिवाय निवृत्तिवेतन सुरू झाल्यावर निवृत्तिवेतनधारकाला पडताळणीसाठी बँकेत जाण्याची गरज नाही. शिवाय रक्कम ‘ईपीएफओ’कडून दिली गेल्यांनतर त्वरित बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
‘सीपीपीएस’ प्रणाली जानेवारी २०२५ नंतर ‘पेन्शन पेमेंट ऑर्डर’ (पीपीओ) एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात हस्तांतरित न करता संपूर्ण भारतभर निवृत्तिवेतन वितरण सुनिश्चित करेल, जरी पेन्शनधारक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाला किंवा त्याने त्याची बँक किंवा शाखा बदलली तरीही त्याला कुठूनही निवृत्तिवेतन मिळविता येईल. निवृत्तीनंतर आपल्या गावी जीवन व्यतित करणाऱ्या निवृत्तिवेतनधारकांसाठी ही नवीन प्रणली मोठा दिलासा ठरणार आहे.
‘सीपीपीएस’ गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये कर्नाल, जम्मू आणि श्रीनगर प्रादेशिक कार्यालयात प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली. ज्यामध्ये ४९,००० हून अधिक ईपीएस निवृत्तिवेतनधारकांना सुमारे ११ कोटी रुपयांचे निवृत्तिवेतन वाटप कर त आले होते, असे मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे. नोव्हेंबरमध्ये विस्तार करत ही प्रणाली आणखी २४ प्रादेशिक कार्यालयांमध्ये प्रायोगिक तत्वावर ही राबवण्यात आली, जेथे ९.३ लाखांहून अधिक निवृत्तिवेतनधारकांना सुमारे २१३ कोटी रुपये निवृत्तिवेतन वितरित करण्यात आले.
डिसेंबर २०२४ मध्ये नवीन प्रणालीच्या माध्यमातून ‘ईपीएफओ’च्या सर्व १२२ निवृत्तिवेतन वितरण क्षेत्रीय कार्यालयांशी संबंधित ६८ लाखांहून अधिक निवृत्तिवेतन धारकांना सुमारे १,५७० कोटी रुपये वितरित केले गेले.
‘सीपीपीएस’ प्रणालीची यशस्वी अंमलबजावणी हा एक ऐतिहासिक टप्पा आहे. हा परिवर्तनकारी उपक्रम निवृत्तीवेतनधारकांना कोणत्याही बँकेतून, कोणत्याही शाखेतून, कोठेही त्यांचे निवृत्तिवेतन मिळवून देण्यास सक्षम आहे. निवृत्तिवेतन धारकांसाठी ‘ईपीएफओ’ सेवांचे आधुनिकीकरण, पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
मनसुख मांडविया, केंद्रीय कामगारमंत्री