मुंबई: भांडवली बाजारातील प्रचंड अस्थिरतेमुळे मार्चमध्ये समभागसंलग्न अर्थात इक्विटी म्युच्युअल फंडांतील ओघ सरलेल्या मार्चमध्ये १४ टक्क्यांनी घसरून २५,०८२ कोटी रुपयांवर मर्यादित राहिला. इक्विटी फंडांमधील गुंतवणुकीला उतरती कळा लागल्याचा हा सलग तिसरा महिना ठरला, अशी माहिती म्युच्युअल फंड घराण्यांची शिखर संस्था असलेल्या ‘ॲम्फी’ने शुक्रवारी दिली.
‘ॲम्फी’ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मार्चमध्ये इक्विटी फंडांमध्ये २५,०८२ कोटी रुपयांचा ओघ दिसून आला, जो फेब्रुवारीत २९,३०३ कोटी रुपये, जानेवारीमध्ये ३९,६८८ कोटी रुपये होता. सलग तीन महिन्यांत तो डिसेंबर २०२४ मधील ४१,१५६ कोटी रुपयांच्या ओघापेक्षा खूपच कमी नोंदवला गेला आहे. तथापि २०२४-२५ या पूर्ण आर्थिक वर्षात, इक्विटी फंडांमध्ये ४.१७ लाख कोटी रुपयांचा एकत्रित प्रवाह दिसून आला, जो आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये नोंदवलेल्या १.८४ लाख कोटी रुपयांपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे.
इक्विटी फंड श्रेणींमध्ये, फ्लेक्सी कॅप फंडांनी मार्चमध्ये सर्वाधिक ५,१६५ कोटी रुपयांची गुंतवणूक मिळविली. मात्र, फेब्रुवारीतील ५,७११ कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक मिळविणाऱ्या सेक्टोरल/थीमॅटिक फंडांची कामगिरी मार्चमध्ये निराशाजनक राहिली. मार्चमध्ये या फंडात फक्त ७३५ कोटी रुपये गुंतविले गेले. ही घसरण बाजारातील बदलत्या कलाकडे खुणावणारी असून गुंतवणूकदार आता सेक्टोरल फंडातून गुंतवणूक अधिक वैविध्यपूर्ण आणि लवचिक गुंतवणूक पर्यायांकडे वळवत आहे.
मार्चमध्ये, मिडकॅप आणि स्मॉलकॅप म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना आकर्षित केले, ज्यात अनुक्रमे ३,४३९ कोटी आणि ४,०९२ रुपयांची गुंतवणूक झाली. त्याआधीच्या फेब्रुवारी महिन्यात मिडकॅप फंडांमध्ये ३,४०६ कोटी रुपये आणि स्मॉलकॅप फंडांमध्ये ३,७२२ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. याउलट, लार्ज-कॅप फंडांतील ओघ आटला आहे, फेब्रुवारीमधील २,८६६ कोटी रुपयांच्या तुलनेत मार्चमध्ये २,४७९ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली.
दुसरीकडे, फेब्रुवारीमध्ये गुंतवणूकदारांनी १,९८० कोटी रुपयांचा निधी ओतल्यानंतर गेल्या महिन्यात गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंडातून (ईटीएफ) ७७ कोटी रुपयांचा निधी काढून घेण्यात आला. शिवाय, फेब्रुवारीतील ६,५२५ कोटी रुपयांच्या तुलनेत मार्चमध्ये डेट अर्थात रोखेसंलग्न फंडांमधून २.०२ लाख कोटी रुपयांचा निधी काढून घेण्यात आला.एकूणच, मार्च महिन्यात म्युच्युअल फंडातून १.६४ लाख कोटी रुपयांचा निधी काढून घेण्यात आला. हा निधी बाहेर पडूनही, म्युच्युअल फंड उद्योगाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता मार्चअखेर किंचित वाढून ६५.७ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे, जी मागील महिन्यातील ६४.५३ लाख कोटी रुपये नोंदवली गेली होती.
‘एसआयपी’ ओघ चार महिन्यांच्या नीचांकी
गुंतवणुकीचा शिस्तशीर पर्याय असलेल्या ‘एसआयपी’च्या माध्यमातून मार्च महिन्यात २५,९२५ कोटी रुपयांचा प्रवाह म्युच्युअल फंडात आला. मात्र ही त्याची चार महिन्यांतील नीचांकी पातळी आहे. याआधी, फेब्रुवारीमध्ये ‘एसआयपी’च्या माध्यमातून २५,९९९ कोटी रुपये, जानेवारीमध्ये २६,४०० कोटी रुपये आणि डिसेंबरमध्ये २६,४५९ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये, सरासरी मासिक ‘एसआयपी’ योगदान २४,११३ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मागील आर्थिक वर्षात सरासरी मासिक योगदान १६,६०२ कोटी रुपयांवर होते.