मुंबई: समभागसंलग्न अर्थात इक्विटी म्युच्युअल फंडांनी सरलेल्या सप्टेंबर महिन्यात ३४,४१९ कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित केली. आधीच्या (ऑगस्ट) महिन्याच्या तुलनेत हा ओघ १० टक्क्यांनी घटला आहे. याचवेळी थीमॅटिक आणि लार्ज-कॅप फंडांकडे गुंतवणूकदारांचा ओढा वाढल्याचे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया अर्थात ‘ॲम्फी’ने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीतून समोर आले. ‘ॲम्फी’च्या आकडेवारीनुसार, समभागसंलग्न अर्थात इक्विटी म्युच्युअल फंडातील गेल्या महिन्यांतील गुंतवणुकीचा हा एप्रिल २०२४ नंतरचा नीचांक आहे. त्या महिन्यांत १८,९१७ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. असे असले तरी इक्विटी फंडातील निव्वळ गुंतवणुकीचा ओघ सलग ४३ व्या महिन्यांत सकारात्मक राहिला आहे. नियोजनबद्ध पद्धतीने गुंतवणुकीचा पर्याय असलेल्या ‘एसआयपी’च्या माध्यमातून गुंतवणुकीत निरंतर वाढीचा क्रम सप्टेंबरमध्ये सुरू राहिला असून, आधीच्या महिन्यातील २३,५४७ कोटी रुपयांच्या तुलनेत ती २४,५०९ कोटी रुपये अशी वाढली आहे.

म्युच्युअल फंड उद्योगातून सप्टेंबरमध्ये ७१,११४ कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेण्यात आली. आधीच्या (ऑगस्ट) महिन्यात या उद्योगात १ लाख ८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. यंदा रोखेसंलग्न (डेट फंड) फंडातून १.१४ लाख कोटी रुपये काढून घेण्यात आल्याने एकूण निर्गुतवणुकीची रक्कम जास्त दिसत आहे. असे असूनही म्यच्युअल फंड उद्योगाच्या व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता गेल्या महिन्यात ६७ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. आधीच्या महिन्यात ती ६६.७ लाख कोटी रुपये होती, असे ‘ॲम्फी’ने नमूद केले.

हेही वाचा : एअर इंडियाद्वारे एअरबस, बोईंगकडून विमान खरेदी

म्यचुअल फंड उद्योगाने एकूण गुंतवणूकदारांच्या संख्येत ५.०१ कोटींचा टप्पा गाठला आहे. फंड घराण्यांनी वित्तीय जागरूकतेसाठी घेतलेल्या परिश्रमाचे हे सुयश आहे. याला गुंतवणूकदारांचा उत्तम प्रतिसाद पाहता, म्युच्युअल फंड हे जनसामान्यांसाठी गुंतवणुकीचे प्रमुख साधन बनत चालले आहे. – वेंकट चालसानी, मुख्याधिकारी, ॲम्फी