पीटीआय, फ्रँकफर्ट
युरोपीय मध्यवर्ती बँक – ‘ईसीबी’ने जागतिक पातळीवर बँकिंग क्षेत्रावर संकटाचे मळभ असतानादेखील गुरुवारी व्याजदरात थेट अर्धा टक्क्याची वाढ केली आहे. युरोपातील २० देशांच्या या मध्यवर्ती बँकेने अनियंत्रित महागाईशी लढा देण्याचा निर्धार व्यक्त करत तिने व्याजदर आता ३.५ टक्क्यांवर नेला आहे.
ईसीबीच्या व्याज दरवाढीमुळे तेथील ठेवींवरील व्याजदरदेखील ३ टक्क्यांवर पोहोचले आहेत. ही २००८ नंतरची ठेवी दराची सर्वोच्च पातळी आहे. युरो क्षेत्रातील देशांना भविष्यातील संभाव्य संकटापासून वाचविण्याचा एक उपाय म्हणून युरोपच्या सरकारी बँकेने व्याजदर वाढवले आहेत. वर्तमान बाजारातील अस्थिरतेचे बारकाईने निरीक्षण केले जात असून युरो क्षेत्रातील किंमत स्थिरता आणि आर्थिक स्थिरता टिकवून ठेवण्यासाठी आवश्यकतेनुसार प्रतिसाद देण्यास तयार आहे, असे ईसीबीच्या प्रमुख क्रिस्तिना लगार्ड यांनी सांगितले. महागाई दर ८.५ टक्क्यांवरून कमी करण्याच्या उद्देशाने ही वेगवान दरवाढ करण्यात आली आहे. सध्या महागाई दर हा मध्यवर्ती बँकेच्या २ टक्के लक्ष्यापेक्षा खूप अधिक आहे.