Share Market roundup: रिझर्व्ह बँकेकडून पाच वर्षात पहिल्यांदाच झालेल्या पाव टक्क्यांच्या व्याजदरातील कपातीनंतर शेअर बाजारात तेजीचा वसंत फुलताना दिसेल, ही आशा शुक्रवारच्या (७ फेब्रुवारी) घसरणीने फोल ठरवली. सलग तिसऱ्या दिवशी झालेल्या घसरणीत व्याजदराबाबत संवेदनशील शेअर्समधील गुंतवणूकदारांच्या नफावसुलीचा सेन्सेक्स-निफ्टीच्या नुकसानीत मोठा वाटा राहिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कमालीची अस्थिरता राहिलेल्या शुक्रवारच्या शेअर बाजारातील व्यवहारात, सेन्सेक्सने जवळजवळ २०० अंशांच्या घसरणीने सुरुवात केली. नंतर २०० पेक्षा जास्त अंशांनी त्यात वाढ झाली आणि दिवसाच्या उत्तरार्धात ५०० पेक्षा जास्त अंशांनी सेन्सेक्सची घसरण वाढत गेली. दिवसअखेरीस बाजार बंद होताना, सेन्सेक्स १९७ अंशांनी किंवा ०.३ टक्के घसरून ७७,८६०.०० वर स्थिरावला. दुसरीकडे निफ्टी ४३ अंशांनी किंवा ०.२ टक्के घसरून २३,५५९.९५ वर बंद झाला. मुंबई शेअर बाजारातील सुमारे १,४६८ शेअर्स वधारले, २,२९३ शेअर्स घसरणीत राहिले. सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि एफएमसीजी क्षेत्रातील शेअर्सना विक्रीचा सर्वाधिक फटका बसला. बहुतेक क्षेत्रवार निर्देशांक लाल रंगात व्यवहार करत बंद झाले.

मात्र अपेक्षित निर्णयावर बाजाराची ही विपरित प्रतिक्रिया का राहिली?

१. भविष्यातील कपातींबाबत साशंकता

रिझर्व्ह बँकेचे नवनियुक्त गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास बहुप्रतिक्षित पाव टक्का व्याजदर कपातीचा निर्णय पतधोरण समितीने संपूर्ण एकमताने घेतल्याचे जाहीर केले. ही इतकी कपात होईल अशी शक्यता शेअर बाजारानेही गृहितच धरली होती. तथापि आणखीही काही उत्तेजन नवीन गव्हर्नरांकडून पेश केले जाईल, अशा आशांची तोरणे गुंतवणूकदारांनी बांधायला सुरुवात केली होती. त्या अंगाने फारसे काही हाती लागले नाही. एकतर ‘तटस्थते’चे धोरण जसेच्या तसे पुढे रेटले गेले, ज्यामुळे भविष्यात व्याजदर कपातींबाबत अनिश्चिततेची स्थिती शेअर बाजाराच्या पसंतीस उतरली नाही.

२. बँकिंग शेअर्समध्ये नकारात्मकता

रिझर्व्ह बँकेच्या पतविषयक धोरणांत बँकांना अतिरिक्त तरलता / रोकड सुलभता मिळवून देणाऱ्या उपायांचा अभाव दिसून आल्याने बँकिंग क्षेत्राला संघर्ष करावा लागेल अशी स्थिती आहे. मूळात रेपो दर घटल्यानंतर, बँकांनी कर्जे स्वस्त करावीत, याला या कारणाने वाव राहिलेला नाही. या नकारात्मकतेचे शेअर बाजारात शुक्रवारी आयसीआयसीआय बँक आणि स्टेट बँकेतील घसरणीने नेतृत्व केले आणि विक्रीचा सर्वाधिक फटकाही याच शेअर्सना बसला. परिणामी निफ्टी बँक निर्देशांक ०.५ टक्क्यांनी खाली आला.

३. नफावसुलीची संधी

गेल्या काही दिवसांत, व्याजदर कपातीच्या आशावादाने बाजार तेजीत होते. अलीकडच्या या दिवसांत निफ्टी निर्देशांक ५०० ते ७०० अंशांनी वाढला आहे. प्रत्यक्ष अपेक्षित निर्णय रिझर्व्ह बँक गव्हर्नरांच्या घोषणेनंतर आल्यानंतर, गुंतवणूकदारांनी भाव वधारलेले शेअर्स विकून नफा गाठीशी बांधून घेण्याची संधी शुक्रवारच्या बाजारातील चढ-उतारांतून साधून घेतली.

४. कंपन्यांच्या निकालातील निराशा

आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालांमध्ये प्रमुख कंपन्यांकडून सुरू असलेली निराशाही बाजार भावनांना धक्का पोहचवणारी ठरत आहे. चालू आठवड्यात या घटकामुळे अनेक शेअर्समधील मोठ्या घसरणीने एकदंर बाजारात नकारार्थी भावनेला बळ देण्याचे काम केले आहे.

५. परकीय गुंतवणूकदारांची माघार

बाह्य प्रतिकूलता आणि ढासळता रुपया यासह परकीय गुंतवणूकदारांकडून निरंतर सुरू असलेली शेअर्सची विक्री ही बाजारातील अलिकडच्या पडझडीच्या प्रमुख कारणांपैकी एक कारण राहिले आहे. याबाबत कोणताही दिलासा अद्याप मिळताना दिसून येत नसून, फेब्रुवारीत परकीयांच्या विक्रीचा मारा सुरूच आहे.