पीटीआय, नवी दिल्ली
रिझर्व्ह बँकेने पतधोरण आढाव्याच्या सलग तिसऱ्या बैठकीत व्याजदर ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय गुरुवारी जाहीर केला. मात्र तरीही खासगी क्षेत्रासह सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी कर्जावरील व्याजदरात वाढीची दुसऱ्या दिवशीच घोषणा केली. सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक आणि महाबँक (बँक ऑफ महाराष्ट्र) यांनी भांडवली खर्चावर आधारित व्याजदरात (एमसीएलआर) वाढ केली आहे. यातून गृह, वाहन, शैक्षणिक कर्जे आणखी महागली असून, कर्जदारांचा मासिक हप्ता वाढणार आहे.
बँक ऑफ बडोदाने एमसीएलआरमध्ये १० आधारबिंदूंनी वाढ केली आहे. बँक ऑफ बडोदाचा एमसीएलआर आता ८.६५ टक्क्यांवरून ८.७० टक्क्यांवर गेला आहे. कॅनरा बँकेने एमसीएलआरमध्ये ५ आधारबिंदूंनी वाढ केल्याने तो आता ८.७० टक्क्यांवर पोहोचला आहे. दोन्ही बँकांचे सुधारित व्याजदर १२ ऑगस्टपासून लागू होणार आहेत. महाबँकेनेही एमसीएलआरमध्ये १० आधारबिंदूंनी वाढ केल्याने तो ८.६० टक्क्यांवर पोहोचला आहे. बँकेने हा सुधारित व्याजदर १० ऑगस्टपासून लागू केला आहे.
आणखी वाचा-प्रत्यक्ष कर संकलन ६.५३ लाख कोटींवर, चालू वर्षात १० ऑगस्टपर्यंत १६ टक्क्यांनी वाढ
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने द्वैमासिक आढावा बैठकीत व्याजदरात बदल केले नव्हते. रिझर्व्ह बँकेने रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम ठेवला आहे. मात्र, महागाईचा दर वाढल्यास व्याज दरवाढीचे संकेत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिले आहेत.