मुंबई : सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रांतील बँकांसह ई-कॉमर्स कंपन्या आणि विमा कंपन्यांना सेवा पुरविणाऱ्या ‘रॅडियंट कॅश मॅनेजमेंट’च्या समभागाने पदार्पणात गुंतवणूकदारांना ११.६० टक्के परतावा दिला आहे. गेल्या महिन्यात प्रत्येकी ९४ रुपयांनी सार्वजनिक प्रारंभिक विक्रीद्वारे गुंतवणूकदारांनी मिळविलेल्या कंपनीच्या समभागाची बुधवारी शेअर बाजारात नोंदणी होताच सकाळच्या व्यवहारात १० टक्के अधिमूल्यासह त्याने ९९ रुपयांच्या पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली.
नंतरच्या व्यवहारात मुंबई शेअर बाजारात तो ११६.७० रुपयांपर्यंत झेपावला, तर त्याचा दिवसाचा तळही ९८ रुपयांनजीक होता. दिवसअखेर समभाग वितरित किमतीच्या तब्बल ११.३८ टक्क्य़ांनी उंचावत १०४.७० रुपयांवर स्थिरावला. गेल्या महिन्यात भांडवली बाजारात पदार्पण केलेल्या काही कंपन्यांनी गुंतवणूकदारांना निराश केले आहे. या पार्श्वभूमीवर ‘रॅडियंट कॅश मॅनेजमेंट’ची पदार्पणातील कामगिरी त्यामुळे चमकदार ठरली आहे.
‘रॅडियंट कॅश मॅनेजमेंट’ची २००५ मध्ये स्थापना झाली होती. कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, कंपनीच्या ग्राहकांमध्ये परदेशी, सरकारी आणि खासगी क्षेत्रातील बँकांचा समावेश आहे आणि त्यांच्या सेवांच्या वापरकर्त्यांमध्ये काही मोठ्या ई-कॉमर्स कंपन्या, बॅंकेतर वित्तीय कंपन्या, विमा कंपन्यादेखील आहेत. कंपनीकडून देशभरातील १२,१५० ठिकाणी रोख रकमेची सुरक्षितरीत्या वाहतूक व्यवस्थापनाची सेवा पुरविली जाते.