डोंबिवली : जीवनाच्या विविध टप्प्यांवर साध्य करावयाची आर्थिक उद्दिष्टे निश्चित करून ती पूर्ण करण्याचे साधन म्हणून गुंतवणुकीकडे पाहिले जायला हवे. अर्थात गुंतवणूक कशासाठी याची नेमकी व स्पष्ट उत्तरे आपल्याकडे असली तर, आपोआपच संयम, शिस्त, अभ्यास आणि सातत्य हे पैलू आपल्या पैशाला जोडले जातात आणि मोठय़ा कालावधीत इच्छित संपत्ती निर्मिती होते, असा सल्ला ‘लोकसत्ता अर्थभान’ कार्यक्रमात तज्ज्ञ मार्गदर्शकांनी येथे दिला.
गुंतवणूकदार अर्थसाक्षरतेच्या उपक्रमांतर्गत, आघाडीचे म्युच्युअल फंड घराणे- आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड प्रस्तुत ‘लोकसत्ता अर्थभान’ हा कार्यक्रम डोंबिवलीतील ब्राह्मण सभेत शनिवारी झाला. सनदी लेखापाल तृप्ती राणे, शेअर बाजार अभ्यासक अजय वाळिंबे आणि आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाचे कंटेन्ट मॅनेजर नीलरत्न चौबळ यांनी गुंतवणूकदारांना मार्गदर्शन केले.
पहिल्या नोकरीतील पहिल्या पगारापासून किंवा शक्य तितक्या लवकर आपण हाती येणाऱ्या पैशाला बचत व गुंतवणुकीच्या माध्यमातून शिस्त लावणे खूप आवश्यक आहे. ही बचत आपण बाजाराचा अंदाज घेऊन म्युच्युअल फंडाच्या विविध गुंतवणूक योजनांमध्ये वेळोवेळी विभाजित करून गुंतवली तर भविष्यात मोठी संपत्ती संचय शक्य आहे, असे तृप्ती राणे यांनी सांगितले.
शेअर बाजारात गुंतवणूक करताना जागरूक राहून पूर्ण अभ्यासांती गुंतवणूक करा. आपण ज्या कंपनीचा शेअर खरेदी केला आहे, त्या कंपनीच्या गतिमानतेवर लक्ष ठेवा. अनेक वेळा जोखीम घेऊन काही जण गुंतवणूक करून पैशाची वाताहत करतात. संपत्ती निर्मिती करताना गुंतवणुकीचा मार्ग अचूक निवडला गेला पाहिजे. ज्यामुळे स्वत:ला व कुटुंबाला कोणताही त्रास होता कामा नये, असा सल्ला अजय वाळिंबे यांनी दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच वक्ते व श्रोते यांच्यात दुवा म्हणून सुनील वालावलकर यांनी भूमिका पार पाडली.
डोंबिवलीतील ‘डी’ या आद्याक्षराचा गुंतवणुकीत ‘डायव्हर्सिफिकेशन’ असा महत्त्वपूर्ण अर्थ आहे. आपली गुंतवणूक ही विविध पर्यायांमध्ये विभागलेली असणे म्हणजेच डायव्हर्सिफिकेशन आणि ते म्युच्युअल फंड गुंतवणुकीतूनच शक्य होते. याचा फायदा असा की, अर्थव्यवस्थेतील विविध घटक व घडामोडीचा सोने, स्थावर मालमत्ता, रोखे व शेअर्स अशा प्रत्येक पर्यायावर वेगवेगळा आणि अनेकदा विरुद्ध पद्धतीने परिणाम होत असतो. वेगवेगळय़ा बाजार चक्रात हा वैविध्यपूर्ण पोर्टफोलियो स्थिरपणे परतावा देण्यासह, बाजारात अधूनमधून येणाऱ्या वाढीच्या संधींचा लाभही मिळवून देतो.
– नीलरत्न चौबळ, कंटेन्ट मॅनेजर, आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड