Fake Payment Apps : गेल्या काही दिवसांत सायबर क्राईमच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार करताना प्रत्येकवेळी सावधगिरी बाळगावी लागते. सामान्य नागरिकांना फसवण्यासाठी ठग विविध युक्त्या आखत असतात. आता त्यांनी युपीआयच्या माध्यमातून ग्राहकांना आणि वापरकर्त्यांना फसवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जीपे, फोनसारखेच दिसणारे मोबाईल ॲप आता प्ले स्टोअरवर उपलब्ध असून याद्वारे केलेले फेक व्यवहाराचे नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होईल, पण तुमच्या खात्यात मात्र पैसे जमा होणार नाहीत. झी बिझनेसने यासंर्भातील सविस्तर वृत्त दिलं आहे.

काही ठग तुम्हाला गुगल पे, फोन पे, पेटीअम किंवा तत्सम अधिकृत युपीआयप्रमाणेच फेक ॲप्स दाखवतील. या फेक ॲप्सचा लोगो, रंग मूळ ॲप्सप्रमाणेच असतो. त्यामुळे सामान्य नागरिकांचा गोंधळ उडतो. या फेक ॲप्समधून तुमच्या युपीआय किंवा स्कॅनरवरून पेमेंट केल्यास त्यांच्याकडून व्यवहार पूर्ण झाल्याचा मेसेज येतो. काही काही फेक ॲप्समधून असे व्यवहार पूर्ण झाल्याचं नोटिफिकेशनही येतं, कधीकधी तुम्हाला त्याचा मेसेजही येतो. पण प्रत्यक्षात तुमच्या खात्यात पैसे जमा होत नाहीत. त्यामुळे अशा लोकांना कसं ओळखायचं आणि अशा गैरव्यवहारांपासून कसं लांब राहायचं हे एक कौशल्य आहे. याबाबत आज जाणून घेऊयात.

व्यवहार हिस्ट्री तपासा – युपीआय किंवा स्कॅनरने तुम्हाला कोणी ऑनलाईन पैसे पाठवले तर त्यांनी दाखवलेल्या मेसेज किंवा नोटिफिकेशनवर अवलंबून न राहता तुमच्या ॲपमधील ट्रांजेक्शन हिस्ट्री चेक करा. जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही.

दबाव टाकण्याचा प्रयत्न – अशा ठगांकडून नेहमी घाईगडबड केली जाते. तुम्हाला तुमचा व्यवहार पूर्ण झाला आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला योग्य आणि पुरेसा वेळ दिला जात नाही. मात्र, अशा परिस्थितीतही तुम्ही तुमचा व्यवहार तपासल्याशिवाय संबंधित व्यक्तीला व्यवहार पूर्ण झाल्याची खात्री देऊ नये.

अनोळखी ॲप – तुमच्या क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या अधिकृत ॲप्सविषयी माहिती ठेवा. जर कोणी अज्ञात किंवा इतर कोणत्याही ॲप्सद्वारे व्यवहार करण्यास सांगत असेल तर तो व्यवहार टाळावा.

व्यावसायिकांनी काय सावधगिरी बाळगावी?

युपीआयद्वारे सर्वाधिक व्यवहार व्यापाऱ्यांकडून केला जातो. ग्राहकांकडून किंवा व्यवसायाच्या निमित्ताने त्यांना युपीआयचा वापर करावा लागतो. अशावेळी ते सर्वाधिक वेळा अशा फेक ॲप्सच्या बळी पडतात. अशावेळी व्यापारांनी काय काळजी घ्यावी याविषयी जाणून घेऊयात.

आपल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करा – ऑनलाईन व्यवहारांबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करा. अशा फेक ॲप्सविषयी त्यांना माहिती द्या.

आधी नगद मग सेवा – सेवा किंवा वस्तू खरेदीवेळी आधी त्यांच्याकडून व्यवहार पूर्ण झाल्याचा तपशील घ्या मगच त्यांना सेवा किंवा वस्तू द्या. ऑनलाईन व्यवहारांच्या तपशीलांची नोंद ठेवा. बिझनेस युपीआयद्वारे व्यवहार झाल्यानंतर स्मार्ट स्पीकरवरून तसा संदेश प्राप्त होतो. या संदेशावर लक्ष ठेवा. फेक ॲप्सद्वारे झालेल्या ॲपमधून या स्मार्ट स्पीकरवर संदेश प्राप्त होत नाही.