मुंबईः सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्रासमोरील वित्तीय आव्हाने दूर करण्यासह, शाश्वत ऊर्जा संक्रमणाला गती देण्यासाठी खासगी क्षेत्रातील फेडरल बँकने, इकोफाय या बँकेतर वित्तीय संस्थेशी भागीदारीची घोषणा केली आहे. एमएसएमई क्षेत्रातील कंपन्यांना व्यावसायिक पद्धतीने छतावर सौर वीजनिर्मिती प्रकल्पांसाठी वित्तपुरवठ्याच्या आगळ्यावेगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी उभयतांमधील ही सह-कर्ज धाटणीची भागीदारी आहे.
या भागीदारीअंतर्गत दरवर्षी ३६०० किलोवॅट छतावरील सौर वीज निर्मितीला विकसित करण्याचे उद्दिष्ट आखले गेले आहे. त्यामुळे एमएसएमई क्षेत्राला विविध आर्थिक लाभ मिळण्याबरोबरच दरवर्षी कर्ब वायूचे उत्सर्जन अडीच हजार टनांनी घटणे अपेक्षित आहे, असे फेडरल बँकेच्या कार्यकारी संचालिका शालिनी वॉरियर या भागीदारीबद्दल म्हणाल्या. २० ते २०० किलोवॅट श्रेणीतील सौर वीज निर्मिती क्षमतेसाठी वित्तपुरवठ्याच्या संधी यातून छोट्या व्यावसायिकांना खुल्या होतील, असे इकोफायच्या संस्थापिका आणि व्यवस्थापकीय संचालिका राजश्री नांबियार म्हणाल्या. इकोफायने या भागीदारीला तिच्या या क्षेत्रातील कौशल्य आणि अनुभवाची जोड दिली आहे.
हेही वाचा : आयसीआयसीआय प्रु. लाइफकडून महिलांच्या विशिष्ट आजारांसाठी नवीन विमा योजना
हरीत वित्त-व्यवसाय चार वर्षांत ५,००० कोटींवर नेण्याचे श्रीराम फायनान्सचे लक्ष्य
श्रीराम समूहाची प्रमुख कंपनी असलेल्या श्रीराम फायनान्स लिमिटेडने हरित वित्तसहाय्याशी संबंधित आपले सर्व व्यवसाय ‘श्रीराम ग्रीन फायनान्स’ या नवीन कंपनीखाली एकत्र आणतानाच, आगामी ३-४ वर्षांमध्ये या विभागात एकूण व्यवसाय ५,००० कोटी रुपयांवर नेण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे.
प्रामुख्याने इलेक्ट्रीक वाहने, बॅटरी चार्जिंग स्टेशन, अक्षय्य उर्जा उत्पादने आणि पर्याय, वीज कार्यक्षम यंत्रे या व्यतिरिक्त अन्य पूरक घटकांना वित्तपुरवठा करण्यावर श्रीराम ग्रीन फायनान्स ही कंपनी केंद्रीत असेल. श्रीराम फायनान्स लिमिटेडचे कार्यकारी उपाध्यक्ष उमेश रेवणकर म्हणाले, या आधारे अतिशय सक्षम हरित वित्त पोर्टफोलिओच्या उभारणीचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. विशेषतः श्रीराम समूहाच्या निमशहरी आणि ग्रामीण भागात विस्तारलेल्या ग्राहक आधाराचा याकामी कंपनीला लाभ मिळविता येईल.