पीटीआय, नवी दिल्ली
नोंदणीकृत नसलेल्या ५० टेलिमार्केटिंग कंपन्या काळ्या यादीत टाकण्यासह, तब्बल २ लाख ७५ हजार दूरध्वनी क्रमांक बंद करण्याची कारवाई भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने अर्थात ‘ट्राय’ने केल्याचे मंगळवारी स्पष्ट केले. चालू वर्षात जानेवारी ते जूनदरम्यान त्रासदायक आणि अनिष्ट दूरध्वनी कॉल्सना पायबंद म्हणून ही कारवाई केली गेली.
अलीकडच्या काळात त्रासदायक आणि अनावश्यक कॉल्स येण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. ‘ट्राय’कडे चालू वर्षाच्या सहामाहीत तब्बल ७.९ लाख दूरध्वनीधारकांच्या या संबंधाने तक्रारी आल्या आहेत. त्यांची दखल घेत ‘ट्राय’कडून ठोस पावले उचलली गेली आहेत. सर्व दूरध्वनी सेवा पुरवठादारांना ‘ट्राय’ने यासंदर्भात १३ ऑगस्टला कठोर निर्देश दिले होते. नोंदणीकृत नसलेल्या टेलिमार्केटिंग कंपन्यांकडून सुरू असलेले जाहिरातपर कॉल तातडीने थांबविण्यास सांगण्यात आले होते. ट्रायने निर्देश देऊनही दूरसंचार कंपन्यांनी पावले उचलली नव्हती. यामुळे अखेर ट्रायने ५० कंपन्यांना काळ्या यादीत टाकून, तब्बल २ लाख ७५ हजार दूरध्वनी क्रमांकांची सेवा बंद केली आहे.
हेही वाचा >>>कर्जवसुली चुकीच्या पद्धतीने नको, रिझर्व्ह बँक डेप्युटी गव्हर्नर स्वामिनाथन यांचा ‘फिनटेक’ना इशारा
ग्राहकांना दिलासा म्हणजे विनाकारण येणारे कॉल ‘ट्राय’च्या या कारवाईमुळे कमी होण्यास मदत होणार आहे. स्वच्छ आणि प्रभावी दूरसंचार परिसंस्था उभारण्यासाठी सर्वच घटकांनी योगदान देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे नोंदणीकृत नसलेल्या टेलिमार्केटिंग कंपन्यांचे दूरध्वनी क्रमांक दोन वर्षांपर्यंत बंद करणे आणि त्यांना काळ्या यादीत टाकणे अशी कारवाई केली जात आहे, असेटी ‘ट्राय’ने स्पष्ट केले आहे.