पीटीआय, नवी दिल्ली
NPS Vatsalya Scheme: मुलांच्या भविष्यासाठी बचत म्हणून पालकांना ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेअंतर्गत आपल्या पाल्याच्या उत्तर आयुष्यासाठी तरतूद म्हणून निवृत्तिवेतन खातेही उघडता येणार आहे. असे वैशिष्ट्य असलेल्या ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी अनावरण केले.
जुलैमध्ये सादर केलेल्या आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेची घोषणा करण्यात आली होती. पालक ऑनलाइन माध्यमातून तसेच बँक शाखा किंवा टपाल खात्याच्या माध्यमातून ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेत खाते उघडू शकतात. खाते उघडण्यासाठी किमान योगदान १,००० रुपये आहे. त्यानंतर सदस्यांना वार्षिक किमान १,००० रुपये खात्यात जमा करावे लागतील.
हेही वाचा : Gold Silver Rate : अचानक सोन्या चांदीचे दर घसरले! जाणून घ्या, किती रुपयांनी झाले स्वस्त?
योजनेचा शुभारंभ करताना, सीतारामन म्हणाल्या की, राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना अर्थात ‘एनपीएस’ने अतिशय स्पर्धात्मक परतावा निर्माण केला आहे आणि भविष्यातील उत्पन्नाची खात्री करताना लोकांना बचत करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. ‘एनपीएस वात्सल्य’ हे मुलांसाठी आधीच अस्तित्वात असलेल्या ‘एनपीएस’चा विस्तार आहे. गेल्या दहा वर्षांत, ‘एनपीएस’चे १.८६ कोटी सदस्य झाले असून व्यवस्थापनाअंतर्गत मालमत्ता (एयूएम) १३ लाख कोटी रुपये आहे.
‘एनपीएस वात्सल्य’ खाते कोणाला उघडता येईल?
अठरा वर्षांखालील मुले ‘एनपीएस वात्सल्य’ खाते उघडू शकतात, जे वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यावर आपोआप नियमित ‘एनपीएस’ खात्यात रूपांतरित होईल. वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यावरच खात्यातून निवृत्तिवेतन (पेन्शन) मिळेल. ‘एनपीएस’ ने समभाग, कर्ज रोखे आणि जी-सेकमधील गुंतवणुकीतून अनुक्रमे १४ टक्के, ९.१ टक्के आणि ८.८ टक्के परतावा दिला आहे.
हेही वाचा : बजाज हाउसिंग फायनान्सच्या समभागात पदार्पणालाच १३६ टक्के वाढ, वर्षातील चौथी सर्वोत्तम सूचिबद्धता
आयसीआयसीआय बँक आणि ॲक्सिस बँकेसह अनेक बँकांनी ‘एनपीएस वात्सल्य’ सुरू करण्यासाठी निवृत्तिवेतन निधी नियामक ‘पीएफआरडीए’शी हातमिळवणी केली आहे. आयसीआयसीआय बँकेने योजनेअंतर्गत काही मुलांची खाती सुरू करून मुंबईत या योजनेचा शुभारंभ केला.