सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या प्रमुखांची बैठक केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या गुरुवारी (ता.६) घेणार आहेत. सरकारी बँकांच्या आर्थिक स्थितीचा या बैठकीत आढावा घेतला जाणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे मागील आर्थिक वर्ष २०२२-२३ चे आर्थिक निकाल जाहीर झाल्यानंतर ही पहिलीच आढावा बैठक होत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी एकूण १ लाख ४ लाख कोटी रुपयांचा विक्रमी नफा मागील आर्थिक वर्षात नोंदविला आहे. त्यात निम्म्याहून अधिक वाटा स्टेट बँक ऑफ इंडियाचा आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये एकत्रित ८५ हजार ३९० कोटी रुपयांचा निव्वळ तोटा नोंदवला होता. तिथून आता त्यांची विक्रमी नफ्यापर्यंत घोडदौड झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचाः शेअर बाजाराच्या उच्चांकानं गुंतवणूकदार झाले श्रीमंत, ५ दिवसांत कमावले ‘इतके’ लाख कोटी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकांच्या आर्थिक कामगिरीसोबत त्यांनी सरकारी योजनांच्या अंमलबजावणीचे उद्दिष्ट गाठण्यात केलेली प्रगतीही या बैठकीत तपासण्यात येणार आहे. यात किसान क्रेडिट कार्ड, स्टँड-अप इंडिया, पंतप्रधान मुद्रा योजना आणि आपत्कालीन कर्ज हमी योजना यांचा समावेश आहे. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत बँकांनी केलेल्या कामगिरीची माहितीही संबंधित बँकांचे प्रमुख अर्थमंत्री सीतारामन यांना देतील.

हेही वाचाः HDFC नंतर आता IDFC First Bank आणि IDFC यांचे विलीनीकरण; ग्राहकांवर काय परिणाम?

थकीत कर्जांवरही चर्चा

बँकांच्या कर्ज वितरणातील वाढ, मालमत्तेची गुणवत्ता, भांडवल उभारणी आणि पुढील आर्थिक वर्षासाठी बँकांची व्यवसाय विस्तार योजना यांचा आढावाही अर्थमंत्री घेणार आहेत. याचबरोबर १००कोटी रूपयांपेक्षा जास्त रकमेची थकीत कर्जे आणि त्यांच्या वसुलीची स्थिती यावरही अर्थमंत्री चर्चा करतील, असे सूत्रांनी सांगितले.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Finance minister will hold a meeting with the heads of the state owned banks and take up the review financial performance vrd